'या’ जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला - बच्चू कडूंचा फैसला ऑन दी स्पॉट, प्रशासनाचा निर्णय बदलला


अकोला :

बेधडक वृत्ती आणि धकाकेबाज पद्धतीने काम करणारे नेते म्हणून महाराष्ट्रभर परिचित असलेले राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी अकोला जिल्ह्यात आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय रद्द केला आहे. त्यांनी तसे आदेश अकोला जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. 

अकोला जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, येथे दररोज शेकडो रुग्ण नव्याने आढळत आहेत. नव्या रुग्णांची संख्या लक्षणीय असल्यामुळे येथे कोरोनाला थोपवणे अवघड जात आहे. या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून अकोला जिल्हा प्रशासनाने आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच प्रत्येक शनिवरी आणि रविवारी लॉकडाऊन पाळण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचारबंदी पाळली जाणार होती. मात्र, हा निर्णय अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी रद्द केला. जिल्हा आढावा बैठकीसाठी आलेल्या बच्चू कडून यांनी ही माहिती दिली.

यावेळी बोलताना, राज्याचे मुख्य सचीव आणि मंत्रालयाच्या काही सूचना आहेत. या सूचनांना घेऊन मी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. या चर्चेनंतर शनिवार आणि रविवारी लॉकडाऊनचा आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

 दरम्यान, मागील काही दिवसांंपासून अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार अकोल्यात कोरोनाचे नवे २५७ रुग्ण आढळले आहेत. तर जिल्ह्यात बाधितांचा आकडा २०५२८ पोहोचला आहे. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ३९६ जणांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात सध्या ५१३८ सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
 

Post a Comment

0 Comments