२२२ तोळे सोन्याच्या शाईने लिहिले रामायण



 ‘रामायण’ किती प्राचीन आहे हे निश्चितपणे कुणालाही ठाऊक नाही. परंपरेनुसार त्रेतायुगात श्रीरामाचा अवतार झाला आणि त्यांच्या समकालीन वाल्मिकी ऋषींनी रामचरित्र अनुष्टुभ छंदात लिहून प्रसारित केले. वाल्मिकी रामायणानंतरही देशभर अनेक संतकवींनी रामायण लिहिले. त्यामध्ये उत्तरेत तुलसी रामायण आणि दक्षिणेत कंब रामायण प्रसिद्ध आहे.

 आजहीलोकांना रामायणाची ओढ वाटते हे या विषयावरील नव्या-जुन्या मालिकांना जो प्रतिसाद मिळाला त्यावरून सहज समजू शकते. केवळ भारतातच नव्हे भारताबाहेरही मलेशिया, इंडोनेशिया, कंबोडियासारख्यादेशांमध्येही रामायण लोकप्रिय आहे. रामायणाबाबतची ही आस्था अनेक लोक अनेक प्रकारे व्यक्त करीत असतात.

गुजरातमध्ये तर चक्क २२२ तोळे सोन्याच्या शाईने रामायण लिहिण्यात आले आहे. १९८१ मध्येरामभाई गोकर्णभाई नावाच्या श्रीमंत भक्ताने हे रामायण बनवले होते. हे सोन्याचे रामायण नुकतेच श्रीरामनवमीला भेस्तानमधील लुहार फलिया येथे दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. १९ किलो वजनाच्या या ग्रंथामध्ये ५३० पाचू, दहा किलो चांदी आणि चार हजारांपेक्षाही अधिक हिर्यांचा वापर करण्यात आला आहे.

 त्याची किंमत अर्थातच कोट्यवधी आहे. हे हस्तलिखित रामायण पूर्ण करण्यासाठी नऊ महिने नऊ तास लागले. या सुवर्ण रामायणाच्या मुखपृष्ठावर शिव, हनुमान आणि गणेशाचे चांदीमधील चित्र आहे. मलपृष्ठही पाच किलो चांदीचे आहे. रामनवमीच्या पवित्र दिवशी हे सुवर्ण रामायण प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. भक्तीचे वैभव अनेकांनी पाहिलेले असेल; पण भक्तीमधून भौतिक वैभवानेही रामायणाला नटवलेले यानिमित्ताने अनेकांनी पाहिले!

Post a Comment

0 Comments