माळशिरस! महाळुंग -श्रीपूर नगरपंचायत अस्तित्वात, तहसीलदार जगदीश निंबाळकर यांची प्रशासक म्हणून नेमणूक


माळशिरस/प्रतिनिधी:

माळशिरस तालुक्यातील महाळुंग-श्रीपुर या ग्रामपंचायत विसर्जित करून नगरपंचायत अस्तित्वात आली आहे. २०१४ पासून महाळुंग-श्रीपूरकरांनी दिलेल्या लढ्याला यश आले. महाळुंग ही ग्रामपंचायत विसर्जित होऊन तिथे नगरपंचायत अस्तित्वात आली आहे. या संदर्भात नगर विकास मंत्रालयाने अंतिम आदेश जारी केला असून, माळशिरसच्या तहसीलदार जगदीश निंबाळकर यांना प्रशासक म्हणून नियुक्त केले आहे. महाळुंग -श्रीपूरकरांना यश आले असले तरी अकलूज व नातेपुते मात्र मागे राहिले आहे. 

२०१४ पासून ग्रामस्थांकडून पाठपुरावा

महाळुंग -श्रीपूर गावचा विस्तार आणि येणारा निधी याचा ताळमेळ बसत नसल्याने सन २०१४ पासून महाळुंग ग्रामपंचायतीचे रूपांतर करण्याचा प्रस्ताव ग्रामसभेत ठेवण्यात आला होता. महाळुंग -श्रीपूर नगरपंचायतीत करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगकरांचा पाठपुरावा सुरू होता. त्याचा पाठपुरावा आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी सुरु ठेवला.


महाळुंग -श्रीपूर ग्रामस्थांच्या लढ्याला यश...

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवून महाळुंग -श्रीपूर, अकलूज आणि नातेपुते या तीन गावांच्या निवडणुका घेऊ नयेत, त्यांचे रूपांतर नगरपालिका व नगरपंचायतीत करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, असे कळवले होते. तरी देखील निवडणूक आयोगाने या तीन गावांच्या निवडणुका लावल्या होत्या. त्यावेळी या तिन्ही गावांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला होता. महाळुंग-श्रीपूरकरांनी बहिष्कार यशस्वी करून दाखवला. अकलूज व नातेपुते येथे मात्र बहिष्कार अयशस्वी झाला होता. नेमक्या याच कालावधीमध्ये महाळुंग -श्रीपूर मधील नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नगरपंचायत अस्तित्वात येण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 


आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही विधान परिषदेमध्ये आवाज उठवून यासंदर्भात भेदभाव होत असल्याचा सरकारवर आरोप केला होता. त्यानंतर नगर विकास मंत्रालयाचे उपसचिव सतीश मोघे यांनी महाळुंग -श्रीपूर ही नगरपंचायत अस्तित्वात आल्याचा अंतिम आदेश काढला आहे. या नगरपंचायतीची यथोचित रचना होईपर्यंत माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांना येथे प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments