"जयसिंगपूर शहरातील नामांकित हॉस्पिटल आवारात बॉम्ब सदृश्य वस्तू : कोल्हापूरच्या शोध व नाशक पथकाने निकामी केला बॉम्ब"

प्रा.डॉ. प्रभाकर माने /शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :

 जयसिंगपूर शहरातील पायोस नामक एका नामांकित हॉस्पिटलमध्ये गावठी बॉम्बच्या साह्याने स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे निष्प्रभ  ठरला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर हॉस्पिटल परिसरात व जयसिंगपूर शहरात एकच खळबळ उडाली.
           
रविवार दिनांक २१ मार्च २०२१  रोजी पायोस हॉस्पिटलमध्ये दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. बॉम्ब ठेवल्याची घटना उघडकीस आल्यानंतर जयसिंगपूर पोलिस व बॉम्ब शोध पथकाने  हा गावठी  बॉम्ब  निकामी केला. बॉम्ब शोध पथक आल्यानंतर  घटनास्थळाच्या अजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती. या विषयाच्या अनुषंगाने नागरिकांच्या मध्ये उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते.
         
मात्र या घटनेबाबत डीवायएसपी रामेश्वर वैजने यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली-कोल्हापूर मार्गावरील डॉ.सतीश पाटील यांचे पायोस हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या कंपाऊडलगत गुरूवारपासून बेवारस अवस्थेत प्लॉस्टिकच्या पोत्यामध्ये काही साहित्य पडून होते. मात्र, सिक्युरिटी गार्डने हे साहित्य पेशंटच्या नातेवाईकांचे असेल म्हणून दुर्लक्ष केले होते. रविवारी सकाळी हॉस्पिटलचा कर्मचारी झाडू मारताना या पोत्याला स्पर्श झाला. त्यामुळे या पोत्यातून टिक-टिक असा टायमरचा आवाज येवू लागला. हॉस्पिटमधील कर्मचारी भरत पाटील यांनी तत्काळ या पोत्यामध्ये पाहिले असता. प्लॉस्टिकच्या पाईप्स्, वायर, आणि इलेक्ट्रॉनिक सर्किटसारखे साहित्य आढळून आले. तर या पोत्यामधून बराच अंतरापर्यंत एक केबल पडलेली लक्षात आली. त्यानंतर पाटील यांनी हॉस्पिटलच्या लगत असणार्‍या मोकळ्या जागेत हे पोते फेकून दिले. व सदरची माहिती पाटील यांनी तत्काळ डॉ.सतीश पाटील व जयसिंगपूर पोलिसांना दिली.
       
 दरम्यान, जयसिंगपूर पोलिस उपअधीक्षक रामेश्वर वैजाने व पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगीड्डे यांनी तत्काळ कोल्हापूर येथील बॉम्ब शोध व नाशक पथक, ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण केल्यानंतर अगदी काही वेळेतच फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर यंत्रणेनेने सुरक्षितरित्या पाहणी करून यंत्रणेच्या सहाय्याने तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर गावठी बाँम्ब जागेवरच निकामी केला. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. यावेळी बॉम्ब शोध व नाश पथकातील हेड कॉन्स्टेबल मानसिंग पाटील, विनायक लाटणे, मुस्ताक शेख, पोलिस नाईक जयंत पाटील, आशिष मिठारे, जीवन कांबळे, रवि पाटील, विनायक डोंगरे, ‘मर्फी’ श्वान यांनी जागेवरच नष्ट केलेल्या बाँम्बचे साहित्य पुढील तपासासाठी ताब्यात घेतले. दरम्यान जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगीड्डे, पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील, पोलिस नाईक गुलाब सनदी, अभिजित भातमारे, अमोल अवघडे, रोहीत डावाळे यांच्यासह पोलिस पथकाचा समावेश होता.
      
 पोलिसांच्या या यशस्वी व कर्तव्यदक्ष कामामुळे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

Post a Comment

0 Comments