सोलापूर/प्रतिनिधी:
शासकीय दवाखान्यातील कोरोना लसीकरण केंद्राशिवाय आता खासगी दवाखान्यातही कोरोनाची लस केवळ २५० रूपयात मिळणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी दिली.
ज्यांना शासकीय लसीकरण केंद्रावर लस घेणे शक्य नाही त्यांच्यासाठी कोविन पोर्टलवर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतील दवाखान्यांची नोंद केली जात आहे. याठिकाणी २५० रूपये भरून केवळ ४५ ते ५९ वयोगटातील कोमॉर्बिड रूग्ण (व्याधीग्रस्त) आणि ज्येष्ठ नागरिकांना लस घेता येईल. याठिकाणची नोंदणी थेट लसीकरणाच्या ठिकाणी किंवा एक ते दोन दिवस आधी पोर्टलवर नोंदणी करून लस घेता येईल.
जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा आरोग्य कर्मचारी-अधिकारी पहिला टप्पा, फ्रंट लाईन वर्कर दुसरा टप्पा पार पडला असून १ मार्चपासून तिसऱ्या टप्प्यास प्रारंभ होत आहे. तिसऱ्या टप्प्यात सात लाख जणांना लस देण्यात येणार असून यामध्ये ४५ ते ५९ वयोगटातील कोमॉर्बिड (व्याधीग्रस्त) रूग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.
अधिक माहिती देताना लसीकरणाचे समन्वयक डॉ. अनिरूद्ध पिंपळे यांनी सांगितले की, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात राहिलेले आरोग्य कर्मचारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, फ्रंट लाईनवर काम करणारे यांचे ‘वॉक इन व्हॅक्सिनेशन’द्वारे थेट लसीकरण करण्यात येणार आहे. त्यांची नोंदणी प्रत्यक्ष शासकीय लसीकरण केंद्रावर ओळखपत्र तपासून करण्यात येणार असून सोबत पॅनकार्ड/मतदान कार्ड/आधारकार्ड यापैकी एक सोबत असणे आवश्यक आहे.
आजपासून कोविन ॲप २.० वर नोंदणी करा
४५ ते ५९ वयोगटातील कोमॉर्बिड (व्याधीग्रस्त) आणि ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदणीसाठी सोमवारपासून कोविन ॲप २.० या ॲपवर नोंदणी करता येईल. नोंदणी झाल्यानंतर शासकीय रूग्णालयातील लसीकरण केंद्रावर मोफत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्न खासगी रूग्णालयात २५० रूपये भरून लस घेता येणार आहे.
अशी करा नोंदणी
कोविन २.० ॲप किंवा आरोग्य सेतू पोर्टल डाऊनलोड करून लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे. एका मोबाईल क्रमांकावरून जास्तीत चार लाभार्थ्यांची नोंदणी करता येईल. ओटीपी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कोविन अकाऊंट येईल. त्यावर नाव, जन्म तारीख, लिंग आदी तपशील भरावा. शासकीय किंवा खासगी दवाखान्यातील लसीकरण केंद्र, तारीख आणि वेळ निवडता येणार आहे. नोंदणी केलेल्या स्लीपची प्रिंट काढता येणार असून लाभार्थ्यांच्या मोबाईलवर संदेशही प्राप्त होणार आहे. ॲपवरून नोंदणी नको असेल तर जवळच्या शासकीय किंवा खासगी लसीकरण केंद्रावर नोंदणी करता येणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
नोंदणी किंवा लसीकरणासाठी आधारकार्ड किंवा मतदार ओळखपत्र, वयाचा पुरावा.
४५ ते ५९ वयोगटातील व्याधीग्रस्तांना नोंदणीकृत डॉक्टरांचे सर्टिफिकेट लागणार असून याचा नमुना केंद्र सरकारकडून दिला जाणार आहे.
28 दिवसांनी दुसऱ्यांदा लस
लस घेतल्यानंतर त्याच व्यक्तीला दुसऱ्यांदा २८ दिवसांनी लस देण्यात येणार असून त्यानंतरच पूर्ण लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र प्राप्त होईल.
लसीकरण झाले तरी निष्काळजीपणा नको
लस घेतल्यानंतर प्रत्येकाने काही कालावधीसाठी काळजी घेतली पाहिजे. सुरक्षित अंतर, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, निष्काळजीपणा करू नका.
आतापर्यंत ३२हजार जणांनी घेतली लस
जिल्ह्यात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ६० हजार जणांची नोंदणी झाली होती. यापैकी 32 हजार जणांनी दोन्ही लसी घेतल्याची माहिती डॉ. पिंपळे यांनी दिली.
लसीकरणानंतर त्रास झाल्यास
लसीकरणानंतर काही जणांना त्रास जाणवतो. मात्र त्रास जाणवल्यास घाबरून न जाता जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रूग्णालयाशी संपर्क करा.
संपर्कासाठी व्हॉटसॲपवर करा संपर्क
लसीकरणाबाबत काही अडचण निर्माण झाल्यास किंवा अडचण असल्यास ९८५०२४५३३३ या फोन नंबरवर केवळ व्हॉटसॲप संपर्क साधावा.
कोमॉर्बिड कोणाला म्हणावे
४५ ते ५९ वयोगटातील व्याधीग्रस्त व्यक्ती. मधूमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, किडनी विकार, कॅन्सर, मूत्रपिंड आणि फुफ्फुसाशी संबंधित आजार अशा २० गंभीर आजाराशी संबंधित रूग्ण कोमॉर्बिड म्हणून ओळखले जातात.
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात राहिलेल्या व्यक्तींनी त्वरित लसीकरण करून घ्यावे. तिसऱ्या टप्प्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरणात भाग घ्यावा, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले आहे.
0 Comments