लोकसभा: ३५ खासदारांनी एकही प्रश्न विचारला नाही, ५ तर मौनच! सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये ४ भाजपचे


लोकसभेत फक्त १५ खासदारांची १०० टक्के हजेरी आहे. यावरून आपण ज्या खासदारांना निवडून पाठवतो ते किती गंभीर आहे हे दिसते. ३५ खासदारांनी तर प्रश्नही विचारला नाही. यातील पाच जणांनी चर्चेत तर भाग घेतला नाहीच, खासगी विधेयकही मांडले नाही. मात्र, ९ खासदार असेही आहेत, ज्यांनी २५० पेक्षा जास्त प्रश्न केले. हे संसदेच्या कामकाजावर लक्ष ठेवणारी संस्था पीआरएस इंडियाचे संशोधन व लोकसभेच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले.

१ जून २०१९ ते १३ फेब्रुवारी २०२१ दरम्यान झालेल्या संशोधनानुसार ज्या खासदारांनी एकही प्रश्न विचारला नाही त्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, सपाचे अखिलेश यादव, मुलायमसिंह यादव, भाजपचे एस. एस. अहलुवालिया, माजी मंत्री राधामोहन सिंह यांच्यासारखे दिग्गज आहेत. ज्यांनी प्रश्न विचारला नाही त्यात भाजपचे १७ आहेत. शंभर टक्के हजेरी लावणाऱ्या १५ खासदारांमध्ये ११ भाजप व दोन-दोन डीएमके, जदयूचे आहेत. सर्वात कमी (दोन टक्के) हजेरी यूपीतील घोषीचे बसपचे अतुलकुमार सिंह यांची आहे. डायमंड हार्बरचे अभिषेक बॅनर्जी १२% उपस्थित राहिले व एक प्रश्न विचारला. हमीरपूरचे भाजपचे पुष्पेंद्रसिंह चंदेल यांनी सर्वाधिक ५१० चर्चेत भाग घेतला.

या खासदारांची सभागृहात शंभर टक्केे हजेरी
भाजप : बद्रीनाथ चौधरी-अजमेर, भोलानाथ-मछलीनगर, जगदंबिका पाल-डुमरियागंज, मनोज कोटक – मुंबई उत्तर पूर्व, मोहन मंडावी- कांकेर, प्रदीपकुमार-कैराना, राजबीरसिंग दिलेर-हाथरस, रमेश कौशिक-सोनिपत, निशिकांत दुबे-गोड्‌डा, गोपाल शेट्‌टी-मुंबई उत्तर. सीएम तीरथसिंह रावत यांचा समावेश आहे.

{धनुषकुमार-तेनकाशी, डी. एन. व्ही. सेंथिलकुमार – धरमपुरी – डीएमके, सुनीलकुमार – वाल्मीकीनगर व कौशलेंद्रकुमार-नालंदा-जदयू.

हे खासदार गप्प : चौधरी मोहन जतुआ- तृणमूल, अतुलकुमार सिंह- बसप, सुशीलकुमार- जदयू, रमेश चंदप्पा- भाजप.

सर्वाधिक प्रश्न राष्ट्रवादीच्या सुप्रियांनी विचारले
ज्या नऊ खासदारांनी २५० पेक्षा जास्त प्रश्न विचारले त्यात पाच महाराष्ट्राचे व चार भाजपचे आहेत. राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी सर्वाधिक २८६ प्रश्न विचारले व ४ खासगी विधेयके सादर केली. धुळ्याचे भाजपचे सुभाष भामरे व शिरूरचे राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांनी प्रत्येकी २७७ प्रश्न विचारले. अंदमान-निकोबारचे काँग्रेसचे कुलदीप शर्मा यांनी २६६ प्रश्न केले व ३७९ चर्चेत भाग घेतला. बलुरघाटचे सुकांता मजुमदार यांनी २६३, मंदसौरचे सुधीर गुप्तांनी २६१, जमशेदपूरचे विद्युत महतोंनी २६१ (भाजप), मावळचे श्रीरंग बारणेंनी २५९, मुंबई उत्तर- पश्चिमचे गजानन कीर्तिकरांनी २५५ प्रश्न विचारले (दोघे शिवसेना).

आई सोनियांपेक्षा पुढे राहुल
उपस्थिती व प्रश्न विचारण्यात वायनाडचे खा. राहुल गांधी आई व रायबरेलीच्या खासदार सोनियांपेक्षा पुढे आहेत. सोनियांची ४४% हजेरी असून त्यांनी ना प्रश्न विचारला ना चर्चेत भाग घेतला. मात्र, राहुल यांची हजेरी ५३ %आहे. त्यांनी ५८ प्रश्न विचारले. तीन चर्चांमध्ये भाग घेतला.

मुलगा सनीपेक्षा पुढे हेमा
उपस्थिती व प्रश्न विचारण्यात मथुराच्या भाजप खासदार हेमामालिनी मुलगा व गुरदासपूरचे खासदार सनी देओलपेक्षा पुढे आहेत. हेमा यांची ५५% हजेरी असून २३ प्रश्न विचारले. १२ चर्चांत भाग घेतला. सनी ३३% उपस्थित राहिले, एक प्रश्न विचारला.

लॉटरीद्वारे घेतात निर्णय
लोकसभेच्या माजी सरचिटणीस स्नेहलता श्रीवास्तव यांनी सांगितले, खासदार रोज पाच प्रश्न देऊ शकतो. रोज सरासरी दोन हजार प्रश्न येतात. त्यातील २५० सूचिबद्ध होतात, त्यांची निवड लॉटरीद्वारे होते. २० तारांकित प्रश्न असतात. २३० अतारांकित असतात व बाकी लॅप्स होतात. यामुळे प्रश्न न विचारण्याचा अर्थ असा नाही की त्यांनी प्रश्न विचारलाच नाही.

Post a Comment

0 Comments