भाजपच्या आमदाराने महावितरणाच्या कनेक्शन कट करायला आलेल्या अधिकाऱ्यालाच ठेवले बांधून


 महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून वीज बिल न भरलेल्या लोकांचे कनेक्शन कट करण्याचे अभियान सुरू आहे. सरकारच्या या निर्णयाचा भाजप आणि मनसेकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. जळगावात शुक्रवारी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या समर्थकांसह वीज विभागाच्या कार्यालयात घुसून जोरदार राडा घातला. दरम्यान त्यांनी महावितरणच्या एका अधिकाऱ्याला बराच वेळ खुर्चीवर बांधून ठेवल्याची घटना घडली आहे. शनिवारी चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापही कुणाला अटक झाली नाही. 

म्हणून कार्यालयाला ठोकले कुलूप : ही घटना जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात घडली आहे. शुक्रवारी मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्त्वात जळगावात वीज कंपनीच्या कार्यालयात एक आंदोलन करण्यात आले. यामध्ये जवळपास २० पेक्षा जास्त लोकांचा समावेश होता. संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीचे अधिकारी मोहम्मद शेख यांना त्यांच्या खुर्चीला अनेक तास बांधून ठेवले. एवढेच नाही तर त्यांना कुणी सोडवू नये म्हणून त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर कुलूप लावण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला. यामध्ये आमदार आणि समर्थक कार्यालयात गोंधळ घालताना आणि घोषणाबाजी करताना दिसत आहेत.

Post a Comment

1 Comments