कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी, रंगपंचमी साजरी करण्यास बंदी


 दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात असून अनेक कडक निर्बंध लावले जात आहेत. मार्च आणि एप्रिल महिन्यात होळी,गुढीपाडवा, रामनवमी, चैत्र नवरात्र आणि शब-ए-बारात यासारखे सण येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभरात हे सण सार्वजनिकपणे साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंबंधीचा आदेश पत्रकाद्वारे दिला आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील सरकारांनी या सणासुदीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढणार नाही याची काळजी घ्यावी आणि त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आधीपासूनच कराव्यात असंही या आदेशात म्हटलं आहे.

जिथे संसर्ग वाढण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाला वाटेल तिथे प्रशासन स्थानिक पातळीवर लॉकडाऊन जाहीर करू शकते, असंही केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्याला अनुसरून महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढलेल्या ठिकाणी आणि मुंबईत सार्वजनिक तसंच खासगी पद्धतीने होळी, धुळवड, रंगपंचमी साजरी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणी स्थानिक प्रशासन निर्णय घेणार आहे. इतर अनेक राज्यांनीही जिथे आवश्यकता आहे तिथे होळी, नवरात्र सार्वजनिकपणे साजरं करण्यास बंदी केली असून इतर ठिकाणी नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. याबाबतचं वृत्त हिंदुस्थान टाइम्सने वेबसाइटवर प्रसिद्ध केलं आहे.

Post a Comment

0 Comments