भाजपाचे युवा मोर्चा अध्यक्ष विरोधात तक्रार देणाऱ्या अशोक नवले यांची आत्महत्या


पंढरपूर/प्रतिनिधी:

भाजपाचे माजी युवा मोर्चाचे अध्यक्ष विदुर अधटराव यांच्याविरुद्ध काही दिवसापूर्वी सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधटराव यांच्याविरुद्ध तक्रार देणाऱ्या अशोक नवले यांनी आज विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना पंढरपूर येथे घडली. याबाबत पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूर शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पंढरपूर येथे राहणाऱ्या अशोक नवले यांनी खाजगी सावकार म्हणून विदूल अधटराव यांनी पैशाचे व्यवहार केले होते. मात्र पाच मार्च रोजी अशोक नवले यांनी अधटराव याच्याविरोधात सावकारकीची तक्रार पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर त्या तक्रारीवर पंढरपूर पोलीस व सहाय्यक निबंधक यांनी अधटराव यांच्या घरी धाड टाकून घराच्या झडतीमध्ये एकूण ४८ चेक, ९ हिशेब वहया, कोरा स्टॅम्प, चेकबुके, बॅक पासबुकसह रोख रक्कम २९ हजार ३४० रूपये जप्त करण्यात आले होते. याच्यावर सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

अशोक नवले यांनी विदुर अधटराव याच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर दोन दिवसांनी अधटराव यांच्या काही कार्यकर्त्यांनी अशोक नवले यांना दमदाटी केली होती. त्यानंतर अशोक नवले दोन दिवस तणावाखाली होते. त्यामुळेच विसरून आत्महत्या केल्याचा आरोप अशोक नवले यांच्या पत्नी यांनी केला आहे. यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. सदर प्रकरणाचा तपास पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी करत आहे.

Post a Comment

0 Comments