जी.ए. - एक शब्दजादुगार....✍🏻 पूर्वा गोडसे

     
एक रिकामी खोली अंधाराचं साम्राज्य असणारी. नैराश्य भीती, अपमान, सूड असे कितीतरी भाव तरंगत आहे त्या खोलीत.एक ती आणि तो चाचपडत आहेत प्रकाशाचे काही कण वर्षानुवर्षे...
एक  छिद्र पडतं भिंतीला आणि त्यातून अपार प्रकाश आत येतो. इवलासा अंधाराचा भाग व्यापून टाकतो.  ही किमया एका 

शब्दजादूगाराने केली आहे. त्या अवलियाचे नाव आहे गुरुनाथ आबाजी कुलकर्णी म्हणजेच जी.ए.

    माणसाच्या शरीराचे जसे अनेक अवयव असतात  तसेच त्याच्या मनाचेही अनेक कंगोरे असतात. त्यात माया, आनंद, दुःख , ईर्षा सूड, उत्साह असे अनेक भाव तरंगत असतात. या मानवी भावनांना योग्य रीतीने छडी  फिरवून त्याची सुंदर पण न उमजनारी एक  जादू करून जी.ए. नी ती शब्दरूपाने संग्रहित केली आणि अर्थात त्याचं गारुड अजूनही आपल्या मनावर आहे.

     
निळासावळा, पारवा, हिरवे रावे, रक्तचंदन, काजळमाया, सांजशकुन, रमलखुणा, पिंगळावेळ ,पैलपाखरे, 
डोहकाळिमा, कुसुमगुंजा, आकाशफुले, सोनपावले अशा अनेक अद्भुत पुस्तकांनी स्वप्नांच्या दुनियेची सैर घडवली. या पुस्तकांची शीर्षके देखील मनाला मोहून टाकणारी आहेत.

   
   जी.ए.चं  व्यक्तिमत्व हे तस खूप अंतर्मुख आहे. आणि त्याच   व्यक्तिमत्त्वाचे अनेक पदर आपल्याला त्यांच्या लिखाणातून दिसतात. इंग्रजीवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी इंग्रजी कथांचे मराठी भाषेत अनुवाद केले आणि मराठी माणसाला देदीप्यमान खच खचून खजिनाने भरलेले 
रांजणनच बहाल केलं. त्यात मग माणके, पोवळे, रत्ने, हिरे अशा अनेक अमूल्य रत्नांनी माणसांचे आयुष्य समृद्ध  केलीत.

     
हो, हो समृद्धच केलीत! अनेकजणांना जी.ए.चं लिखाण नकारात्मक वाटते कारण त्यातील पात्रे आणि त्यांच्या भाव भावना या एका नकारात्मक दोलनामय अवस्थेतच असतात. तिथे कथांमधील पात्रांची घालमेल होत असते. बहुतेक करून प्रसंग हे वाळवंटच असतात. आणि इंग्रजी अनुवाद करताना ही जीएंनी अशाच 'निगेटिव्ह शेड' च्या कथांना प्राधान्य दिले.

      
पण बुद्धी ऐवजी मनाने त्यांच्या कथा किंवा लिखाण वाचत जातो. तेव्हा आपल्याला त्या वाळवंटात एक 'पिवळा पक्षी' दिसतो आणि हाच तो पिवळा पक्षी मग आपल्या समृद्ध करतो. कधी कधी त्यांच्या कथा वाचताना सूर्याची इवली  पावले मनात येतात आणि त्या सोनपावलांनी मन समृद्ध होतं. यश ,कीर्ती व्यवहारीपणा, चाकोरीबद्धता, साचेबद्धता या सगळ्या नश्वर भावनेला छेद देऊन एक वेगळी चाकोरीबाहेरील जी.ए. यांची कथा जेव्हा वाचतो तेव्हा वास्तवातही स्वप्नांचे सेतू बांधले जातात. 

 "तू असाच वर जा.
 अंधाऱ्या सान्दरीतुन निघालेलं तुझं आयुष्य न चिरडल्या जाणाऱ्या ईर्शेन वर वर जाऊन एका तृप्त क्षणी सूर्यप्रकाशाला भेटू दे.
 तुला जर फुले येतील -
 आणि तुला सोन्याचा लहान पेल्यासारखी फुले यावीत व त्यांच्या स्पर्शाने पराग सांडून बोटांची टोक पिवळी सुगंधी व्हावीत.
 तुला जर फुल येतील तर अशा सहस्त्र फुलांना घेऊन तू तुझ्यावर वाकलेल्या आभाळाला सामोरं जा व त्याच्या निळ्या साक्षीनं तू त्यांच्यात सुर्यप्रकाश साठवून घे.

तुला जर फळ येतील -
आणि तुला दर पानांआड लहानसं लाल फळ यावं व ते इतकं रसरशीत असावं, की त्या प्रत्येकाच्या लाल रंगात सुर्यप्रकाशाचा एकएक कण सतत सुखात नांदत राहावा.

तुला जर फळ येतील ,तर त्यांच्यासह तू क्षितिजाकडे पाहा. कारण तू अशा अंधारातून त्याचाच शोध घेत त्याच्याकडे आला आहेस. 
मग तुझ्या बीजांची फळ सर्वत्र विखरुन त्या तुझ्या विजयाच्या खुणा सर्वत्र रुजू देत. 
जर कणाएवढय़ा प्रकाशाचा काजवा तुला कधी दिसला. तर तू त्याच स्वागत कर. त्या कणाच्या अभिमानानं त्यानं रात्रीच्या अमर्याद अंधाराला आव्हान देऊन 
त्याचा एक कण जिंकून प्रकाशित केला आहे. 
आभाळात एखाद लहान पाखरू उडताना दिसलं तर तू त्याला अथित्य दाखव. 
कारण दोन कोवळ्या पंखाच्या आत्म्विश्वासाने ते आभाळाला किंचित मागं रेटत आहे. 
जर कधी एखाद्या मुलानं तुझं एक रसरशीत पान घेऊन दुमडून ते पुन्हा आडवं उघडलं व पानाचा आरसा केला; किंवा कधी तुझं पिवळं फूल तोडून बोटं पिवळ्या धुळीनं माखून घेतली; अगर तुझं एक लाल फळ खुडून ते दोन बोटात चेंगरत रसाचा लाल धागा काढला, तर तू त्याच्यावर क्रुद्ध होऊ नकोस.
कारण, कुणास ठाऊक , अब्जामध्येच एक आढळणारे असं ते मूल असून ते देखील भोवतालच्या अंधाऱ्या  अजस्त्र भिंती फोडून सूर्यप्रकाशाकडे येण्याची कधीतरी धडपड करणार असेल आणि तसं असेल तर ते तुझ्या रक्ता नात्यातच आहे. म्हणून तू त्याच्यावर क्रुद्ध होऊ नकोस.
 एक पान गेल्याने तुला दारिद्र येणार नाही.
एक फूल गेल्याने तुझं सौंदर्य उण भासणार नाही.
 एक फळ नाहीस झाल्यानं तुझ्या आयुष्यकारणोंनैराश्य  येणार नाही. इतकं तुला वैभव आहे. इतकं वैभव तुला मिळो !

या साऱ्यात मला विशेष सुख आहे, कारण तुझे एक पान म्हणजे माझा एक एक श्वास आहे म्हणून तू म्हणजे मीच स्वतः आहे. मी संपलो नाही तर मी केवळ बदललो आहे. 
तू आपलं सारं सामर्थ्य  घेऊन आभाळाखाली सूर्यप्रकाशात वर आला आहेस एवढे इतरांना समजू दे.
 मी अंधारात लाल प्रकाशात दडपून चिरडला गेलो नाही, तर मीच हिरव्या कारंजा प्रमाण  वर आलो आहे हे देखील इतरांना कळू दे.
 म्हणून तू असाच वर जा. 

 हे 'पिंगळावेळ' पुस्तकातील 'स्वामी' या कथेमधील स्वगत. असं त्यांचं लिखाण आशेची किरण असणार आहे. 

गंभीरता आणि मनाला अक्षरशः हेलावून टाकणारा शेवट हे जीएंच्या कथेमधील महत्त्वाचे पैलू. सामान्य माणूस विचारही करू शकत नाही अशा निराळ्याच भावविश्वात कथा गुंफली जाते. आणि म्हणूनच जी.ए  वर अपार प्रेम करणारे वाचक अक्षरशा तहानभूक विसरून त्यांच्या पुस्तकांचा फडशा पाडतात.

जी.ए. यांचे बालपण हे खेडे गावातच गेले. त्यामुळे खेड्यातील गोड छटा त्यांच्या कथेत आढळतात. चैत्र या कथेतील नायिका असो किंवा राधी, कैरी, लक्ष्मी अशा अनेक कथांना ग्रामीण पार्श्वभूमी लाभली आहे. आणि या कथा मानवाचे वेगवेगळे भाव दर्शवतात.

 इंग्रजी अनुवाद यांपैकी 'आत्महत्या' ही कथा असो किंवा ओर्फियस् ही कथा. अशा कथा शेवटाला झटका देणाऱ्या कथेमुळे आपल्या केवळ भुवया उंचावल्या जातात नारिंगी हात रुमारुमाल, सौदा, घड्याळ या कथा तर केवळ अद्भुत... 

 राजकुमार, राजकन्या, चेटकिन, जादू ,आणि सोन्याने भरलेली रांजणे ,अकल्पित वाटाव्या अशा योजना, मखमली शब्द, स्वप्न वाटावेत असे प्रसंग ही खरंतर बाल वाडमयाची  वैशिष्ट्ये. 

  जीएंच्या ओंजळधारा आणि अमृतफळे या पुस्तकांमध्ये ही वैशिष्ट्ये येतात. खरं तर ही पुस्तके लहान मुलांसाठी लिहिली. पण तरीही मोठ्यांना देखील वेगळ्याच अभूतपूर्व विश्वात घेऊन जातात आणि थरारक अनुभवातून मग आपण आणखीन समृद्ध होतो.

जीएंच्या कथा वाचताना आपल्याला आणखीन एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आपण फक्त मनोरंजन म्हणून त्या कथा वाचत नाही. सुरुवातीला जरी मनोरंजन ही भावना असेल तर शेवटी आपण त्या कथेतून अक्षरशः प्रवास करत होतो हा अनुभव येतो.
 विषारी सर्पदंश व नाजूक मलमली फुलांचे स्पर्श हे दोन्ही अनुभव कथा वाचताना येतात. आणि आपण खडबडून जागे तरी होतो किंवा मग स्वप्न नशेत गुंग होऊन मुग्ध होऊन जातो. काही कथा या पार आकलनापलिकडे असतात तरी थरारक वाटतात  आणि अचंबित करतात.

पिंगळावेळ पुस्तकातील 'यात्रिक' या कथेत एका उपदेशकाचे आणि नायकाचे संभाषण पहा.
 
उपदेशक म्हणाला तू अद्याप तर्काच्या कृष्ण सर्पान वेटोळला आहेस त्याचेच फूत्कार तुझ्या शब्दातून बाहेर पडत आहेत. ज्ञानप्राप्ती पाहिजे असेल तर बुद्धीचा गर्व, तर्काचा ताठरपणा आणि अहंपणा चा मद सोडायला हवा. तोपर्यंत तुझ्याशी बोललो म्हणजे केवळ कालापव्यय आहे. तू झुंजण्यासाठी  आला आहेस जाणण्यासाठी नाहीस.

डॉन उठता उठता म्हणाला. "आपणाला अंतिम सत्य समजलं असं म्हणालात म्हणून मी फार आशेने प्रश्न विचारले रोष मानू नका. मी कधी बुद्धीचा गर्व धरला नाही कारण मला बुद्धीच नाही. तर्काचा ताठरपणा जर माझ्यात असता तर मी माझं गाव सोडून कधी बाहेर पडलो असतो का? अहंपणा असता तर जन्मभर कुचेष्टा सहन केली नसती. कधी असेलच तर माझ्याच अहंपणा नसून स्वत्व होत. मी भिकाऱ्यांच्या शेजारी बसून बोललो आहे. धनगरांच्या सानिध्यात टेकड्यांवर रात्री काढल्या आहेत. शेवटी मला एकच गोष्ट कळून चुकली कि मी अगदी पूर्ण असाध्य वेडा आहे. पण इतर माणसं कोणत्या बाबतीत शहाणी आहेत हे मात्र मला कधी उमगले नाही."

 माणूस हा एक यात्रीकच आहे.  सगळे जग म्हणते म्हणून त्याने त्याच मार्गावर का चालत रहावं ?आणि त्याला पडलेले प्रश्न मनातील गुंता याचा सविस्तर आलेख म्हणजेच यात्रीक ही कथा. 

जी.ए एक गूढ आहे.कधी न उलगडणारे कोडे आहे. या शब्द जादूगाराने कधी वास्तवाचे चटके दिले, कधी स्वप्नवत वाटाव्या अशा प्रदेशात तो घेऊन जातो. तर कधी निराशेतही आशेची छोटी  किरणे दाखवून आणतो...

Post a Comment

0 Comments