आमदार राजेंद्र राऊत यांना फेसबुक लाइव्ह वरून जीवे मारण्याची धमकी



बार्शी/प्रतिनिधी:

 बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे फेसबुक लाइव्ह वरुन त्यांना धमकी देण्यात आली आहे, असा आरोप करण्यात आला आहे. नवी मुंबईच्या पनवेल याठिकाणच्या असणाऱ्या नंदू उर्फ बाबा पाटील याने ही धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. बाबा पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत चंद्रकांत खराडे (वय ४० वर्ष) रा.शिवाजी आखाडा, बार्शी यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात भादवि कलम ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या विरोधात राजकारण कराल तर मुंबईतून बाहेर पडू देणार नाही, अशी धमकी राजेंद्र राऊत यांना देण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, या इसमाने राजेंद्र राऊत यांच्या समवेत नगरसेवक अमोल चव्हाण यांना देखील धमकावले आहे. तक्रारीत असे नमुद केल्यानुसार त्याने अशी धमकी दिली आहे की, ‘तुम्ही मुंबईत आल्याचे समजले तर मुंबईतून बाहेर पडू देणार नाही. भाऊसाहेब आंधळकर यांच्या विरोधात राजकारण केलं किंवा त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर गाठ माझ्याशी आहे. तुम्हाला जिवंत सोडणार नाही आणि तुम्हाला ओपन चॅलेंज करतो आहे.’

या तक्रारीनुसार संबंधित इसमाने बार्शीत येऊन मारण्याची धमकी दिल्याचेही म्हटले आहे. त्याने पुढे असे म्हटले आहे की, ‘मी बार्शीत येऊन नंग्या तलवारी नाचवेन. हे करताना माझ्या विरोधात कितीही पोलीस यंत्रणा लावा, तुमच्या कार्यकर्त्यांची यंत्रणा लावा तरी माझ्यावर परिणाम होणार नाही.’ राऊत यांनी बरोबर १० पोलीस ठेवले तरी त्याच्यावर काही परिणाम होणार नाही, असे म्हणत त्याने तलवारीने मारण्याची धमकी दिली आहे.

Post a Comment

0 Comments