शिकवणी शिक्षिके प्रताप! पत्रिकेतील मंगळ दूर करण्यासाठी केले १३ वर्षाच्या विद्यार्थ्यांशी लग्न

 
मंगळ दोषापासून मुक्ती मिळावी म्हणून लोक मांत्रिकाकडे जातात. मांत्रिकाने सुचवलेले अजब उपाय करतात. असाच एक अजब प्रकार पंजाबच्या जालंधरमध्ये घडला आहे. एका शिक्षिकेने तिच्या पत्रिकेतील ‘मंगळा’वर मात करण्यासाठी आपल्या १३ वर्षाच्या विद्यार्थ्यांशी लग्न केले. जालंधरच्या बस्ती बावा खेल भागात ही घटना घडली आहे.

एका पुजार्‍याने सांगितलेल्या मांगलिक दोषामुळे तिचे लग्न होत नसल्यामुळे तिचे कुटुंब चिंतीत असल्याचे या महिलेने पोलिसांना सांगितले. या दोषातून किंवा कमतरतेपासून मुक्त होण्यासाठी तिला एका अल्पवयीन मुलाबरोबर प्रतीकात्मक लग्न करावे लागेल, असं एका पुजा-याने तिला सुचवले होते.

त्या महिलेच्या शिकवणी वर्गात शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलाला वर म्हणून निवडले. शिकवणी शिक्षिकेने मुलाच्या आई-वडिलांना सांगितले की शिकवणीसाठी त्याला तिच्या घरी एक आठवडा राहणे आवश्यक आहे. जेव्हा मुलगा घरी परतला आणि त्याने कुटुंबाला ही घटना सांगितली तेव्हा ही बाब उघडकीस आली. पीडित मुलाच्या आई-वडिलांनी ही बाब तत्काळ बस्ती बावा खेल पोलिस स्टेशनला कळविली.

शिक्षक आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांनी जबरदस्तीने हळदी-मेहंदी सोहळा आणि ‘सुहागरात’ विवाह विधी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नंतर शिक्षिकेला तिच्या बांगड्या फोडून विधवा घोषित केले. सुचवलेले विधी पूर्ण करण्यासाठी कुटुंबीयांनी शोकसभेचे आयोजन देखील केले होते. पीडित मुलाच्या कुटुंबाने पोलिसांना सांगितले की, मुलाला बेकायदेशीरपणे बंदी बनवण्यात आले होते आणि यावेळी घरातील सर्व कामे करण्यास भाग पाडले होते.

बस्ती बावा खेल पोलिस स्टेशनचे हाऊस अधिकारी गगनदीपसिंग सेखोन यांनी पोलिसांकडे तक्रार आल्याची पुष्टी केली आहे पण नंतर दोन्ही पक्षांमधील तडजोडीनंतर ती तक्रार मागे घेण्यात आली असे सांगितले. आरोपी शिक्षक आणि तिच्या पालकांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

Post a Comment

0 Comments