पंढरपूर पोटनिवडणूक! भगीरथ भालकेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर; मतदारसंघातील आव्हाने भगीरथ भालके पेलणार का?


पंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

पंढरपूर मतदारसंघाचे आमदार दिवंगत भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी आज राष्ट्रवादीकडून आदरणीय शरद पवारांच्या मान्यतेने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १७ एप्रिलला मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीसाठी २३ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून ३० मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर ३ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. मंगळवेढा पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. काही वेळापूर्वीच भाजपकडून समाधान महादेव आवताडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली होती. यानंतर आता राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.आता ही उत्सुकता संपलेली आहे. राष्ट्रवादीकडून दिवंगत भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करून ही घोषणा केलेली आहे. ‘आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात येत आहेत.

ते नक्की विजय होतील, असा आम्हाला विश्वास आहे. भगीरथ भालके यांना शुभेच्छा’ अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केलेले आहे.

परंतु दुसरीकडे महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुखाने बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी बैलगाडीत बसून येत मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होईल असे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments