मी २०-२२ वर्षांचा असताना बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता! - पंतप्रधान नरेंद्र मोदी


पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यावर आहेत. बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या ५० वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी मोदी तिथं पोहचले आहेत. यावेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्याचे स्वागत केले व मोदींना गार्ड ऑफ ऑनर दिला गेला. या ठिकाणी पोहचल्यानंतर सर्वप्रथम पंतप्रधान मोदी यांनी ढाकामधील सावर येथील शहीद स्मारकास भेट दिली. या ठिकाणी त्यांनी वृक्षारोपण केलं व तेथील व्हिजिटर्स बुकमध्ये संदेश लिहून स्वाक्षरी केली.

यानंतर ढाका येथील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या संघर्षात सहभागी होणं, माझ्या जीवनातील आंदोलनांपैकी एक होतं. माझं वय २०-२२ असेल जेव्हा मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता.”

तसेच, “मी आज भारताच्या शूर सैनिकांना सॅल्यूट करतो, जे मुक्तीजुद्धोमध्ये बांगलादेशच्या बंधू-भगिनींसोबत उभे राहिले. मला आनंद आहे की, बांगलादेश मुक्तीसंग्रमात भाग घेतलेले अनेक भारतीय सैनिक आज या कार्यक्रमास उपस्थित आहेत.” असं देखील मोदींनी यावेळी म्हटलं.

पंतप्रधान मोदी यांनी शेख मुजीबुर रहमान यांना मरणोत्तर गांधी शांती पुरस्काराने सन्मानित केलं. त्यांनी पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे हा पुरस्कार सपूर्द करून शेख मुजीबुर रहमान यांच्या आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान मोदी म्हणाले, दोन्ही देशांचे संबंध घट्ट होत आहेत. हा सन्मान देताना मला अत्यंत आनंद होत आहे. बांगलादेशचे राष्ट्रपती अब्दुल हामिद, पंतप्रधान शेख हसीना आणि येथील नागरिकांचे मी आभार व्यक्त करतो. तुम्ही या गौरवशाली क्षणांमध्ये, या उत्सवात सहभागी होण्यासाठी भारताल सप्रेम निमंत्रण दिलं. मी सर्व भारतीयांच्यावतीने शेख मुजीबुर रहमान यांना श्रद्धांजली अपर्ण करतो. ज्यांनी बांगलादेशच्या जनतेसाठी आपल्या जीवनाचा त्याग केला.

Post a Comment

0 Comments