सोलापुरात हॉटेलसह अन्य ठिकाणी ५० पेक्षा जास्त लोक आढळले की होणार ‘सील’ची कारवाई


सोलापूर/प्रतिनिधी:

सोलापुरात हॉटेल, बार, मंगल कार्यालय तसेच मॉल्स याठिकाणी ५० पेक्षा जास्त जणांची गर्दी आढळल्यास तत्काळ कारवाई करा, पहिल्या कारवाईतच संबंधित मंगल कार्यालय, मॉल्स आणि हॉटेल सील करा, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बुधवारी सायंकाळी दिले आहेत. बुधवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची आढावा बैठक होणार होती. 

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांची नियोजित बैठक रद्द झाली. गुरुवारी दुपारी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांची याबाबत बैठक झाली. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना आणखी कडक होण्याची चिन्हे आहेत.
 
सिव्हिल हॉस्पिटल आणि अश्विनी हॉस्पिटल्समधील प्रयोगशाळेत आरटीपीसीआर टेस्ट वाढविण्यात आल्या आहेत. सिव्हीलमध्ये टेस्टींगसाठी नवे आरटीपीसीआर मशीन उपलब्ध झाले आहे. आता कोरोनाच्या टेस्ट अधिक गतिमान पद्धतीने होतील. सध्या ॲंन्टीजेन रॅपीड टेस्टींगसाठी हापकीन इन्स्टिट्यूटकडून १ लाख कीट मागविण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली आहे.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेतंर्गत जाहीर केलेल्या नियमावलीचे उल्लंघन झाल्यास संबंधित मंगल कार्यालय, हॉटेल, बार आणि मॉल्स हे तत्काळ सील करून राज्य सरकार जोपर्यंत लॉकडाऊन नियमावली शिथिल करत नाही, तोपर्यंत संबंधित सर्व हॉटेल, मंगल कार्यालय बंद राहतील, असे या आदेशात म्हटले आहे.

 नियमावली आणखी कडक

– अंत्यविधीसाठी २० लोकांना परवानगी
– लग्न समारंभात ५० लोकांनाच परवानगी
– हॉटेल, बारमध्ये मास्कशिवाय प्रवेश नसावा
– प्रत्येक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिचे पालन व्हावे
– पॉझिटिव्ह रुग्णावर गृहविलगीकरण्याबाबतचा शिक्का मारावा
– सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांना पूर्णता बंदी
– सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्याला एक हजार रुपये दंड करा
– खाजगी वाहनात गर्दी असल्यास तत्काळ कारवाई करा

Post a Comment

0 Comments