उपसरपंच निवडीच्या वादातून ग्रामपंचायत सदस्याचा खून


कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव गावात उपसरपंच निवडीवरून झालेल्या हाणामारीत एका ग्रामपंचायत सदस्याचा खून झाला आहे. पांडुरंग काळे असे मृत सदस्यांचे नाव असून ते शिवसेना पक्षाचे सदस्य होते.

बोरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीवेळी आमदार सुमन पाटील आणि खासदार संजय पाटील समर्थकांत झालेल्या तुंबळ हाणामारीत पांडूरंग जनार्दन काळे (वय ५७) या ग्रामपंचायत सदस्याचा खून झाला आहे. या मारामारीत गणेश पाटील हे आणखी एक सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. शिवाय आठ ते दहा कार्यकर्तेही जखमी झाले आहेत. ही दुर्घटना गुरुवारी दुपारी दीडच्या दरम्यान घडली. कवठेमहांकाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगवला.

 नामदेव पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी बुधवारी (दि. ४) विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान ग्रामपंचायतीमध्ये अकरा पैकी आठ सदस्य खासदार संजय पाटील गटाचे तर तीन सदस्य आमदार सुमन पाटील गटाचे आहेत. यातील खासदार संजय पाटील गटाचे दोन सदस्य फोडून आपला उपसरपंच करण्याची रणनिती आमदार सुमन पाटील गटाने आखली होती. 

उपसरपंच निवडीचा कार्यक्रम सुरु होताच ग्रामपंचायत सदस्य मतदानासाठी येत असताना ग्रामपंचायतीच्या इमारतीसमोर दोन्ही गटाचे समर्थक एकमेकांना भिडले.काठ्यांच्या सहाय्याने तुंबळ हाणामारी सुरु झाली. हाणामारीत ग्रामपंचायत सदस्य पांडूरंग जनार्दन काळे यांना काठ्यांचा मार बसल्याने गंभीर जखमी झाले. उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असतानाच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेमुळे तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments