बार्शी - सोलापूर रोडवर ९० पोती गुटखा जप्त


सोलापूर प्रतिनिधी :

 जिल्ह्यात ‘येथे’ पकडला ९० पोती गुटखा; पोलिसात गुन्हा दाखल

राज्य सरकारच्या वतीने गुटखा बंदी लागू केली असतानाही मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने गुटख्याची वाहतूक होत असून अवैध मार्गानेच गुटखा विकला जात आहे. अशा विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने जोरदार मोहिम हाती घेण्यात आली आहे. बार्शी येथील व्यापार्‍याकडून सोलापूर शहरातील एका व्यापार्‍याकडे येत असलेल्या गुटख्याचा टॅम्पो बार्शी रोडवर कारंबाजवळ अन्न व औषध विभागाच्या अधिकार्‍यांनी पकडून ९० पोती खुटख्यासह एकूण ७ लाख ९२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बार्शी रोडवरून सोलापूरकडे अवैध गुटखा येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांना मिळाल्यानंतर त्यांनी टाटा टेम्पो ४०७ एमएच ०६ एजी २०८८ या वाहनाला थांबवून नंतर सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याची तपासणी केली. तेंव्हा वाहनांमध्ये ९० पोती गुटखा किंमत ५ लाख ९२ हजार ६८० रूपये असल्याचे आढळले. सदर वाहनचालक इकबाल नदाफ हा फरार झाला असून सह वाहनचालक मोहम्मद आरिफ मोहम्मद युसुफ बागवान रा. सोलापूर यास ताब्यात घेतल्यानंतर अधिक चौकशी केली असता हा सर्व माल सोलापूर शहरातील व्यापारी अस्लम तांबोळी यांच्या मालकीचा असून त्यांच्या सांगण्यावरूनच बार्शी येथील व्यापार्‍याकडून आणला असल्याचे त्यांनी सांगितले.

या कारवाईमध्ये २ लाख रूपये किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले असून एकूण ७ लाख ९२ हजार ६८० रूपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी फरार वाहन चालक इक्बाल नदाफ,सह चालक मोहम्मद आरिफ मोहम्मद युसुफ बागवान, साठा मालक अस्लम तांबोळी व वाहन मालक समीर सुतार यांचे विरूद्ध तालुका पोलिस स्टेशन येथे भादंवि ३२८,१८८,२७२,२७३,३४ व अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कलम ५९ नुसार फिर्याद देण्यात आली आहे. सदर कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदीप राऊत यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांच्या सहकार्याने पार पाडली.

नागरिकांनी आपल्या अजूबाजूला कोठेही अवैध गुटख्याची विक्री अथवा वाहतूक होत असेल तर त्वरीत अन्न व औषध प्रशासन सोलापूर यांच्याकडे संपर्क करावा.

– सहा.आयुक्त (अन्न) प्रदिप राऊत

Post a Comment

0 Comments