माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुखांवर केले गंभीर आरोप


माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत, थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. अनिल देशमुख यांनी निलंबित एपीआय सचिन वाझे यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक दावा, परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. 

परमबीर सिंग यांच्या पत्रातील मुख्य मुद्दे :

१. IPS परमबीरसिंह म्हणतात, मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. तिथं अँटीलियाच्या केसबद्दल पूर्ण माहिती देत होतो. त्यावेळेसच मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दलही तुमच्या कानावर घातलं.

२. एवढच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देशमुखांच्या चुकीच्या कृतीची माहिती दिली. तिथं उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना खरं तर ही माहिती आधीच होती असं माझ्या लक्षात आलं.

 ३. सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितलं.

४. फेब्रुवारीच्या मध्यावर वाझेंना शासकिय निवासस्थानावर बोलवून गृहमंत्री देशमुखांनी ही सूचना केली. त्यावेळेस देशमुखांचे खासगी सचिव पलांडे हेही हजर होते. एक दोन घरातले स्टाफ मेंबरही हजर होते. एवढच नाही तर १०० कोटी रुपये गोळा करण्यासाठी काय करायचं हेही देशमुखांनी सांगितलं.
 
५.देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत १७५० बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून २ ते ३ लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला ४० ते ५० कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल.

६. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबतच्या भेटीनंतर सचिन वाझे हे त्याच दिवशी माझ्या ऑफिसला आले आणि मला देशमुखांनी केलेल्या मागणीबद्दल सांगितलं. मला त्याचा धक्का बसला. खरं तर मी ही परिस्थिती कशी हाताळायची याचा विचार करत होतो.

७. काही दिवंसापूर्वी सोशल सेवा विभागाचे एसीपी संजय पाटील यांना अनिल देशमुख यांनी त्यांच्या मुंबईतील शासकीय निवास्थानी बोलवून हुक्का पार्लर विषयी चर्चा केली. त्याबैठकीला इतर अधिकारी आणि अनिल देशमुख यांचे पीए पलांदे उपस्थित होते.

 ८. दोन दिवसांनंतर पाटील आणि डीसीपी भुजबळ यांना अनिल देशमुख यांच्या निवास्थानी बैठकीसाठी बोलवण्यात आले. पाटील आणि भुजबळ यांना अनिल देशमुख यांच्या घराबाहेर थांबवण्यात आलं. त्यावे्ळी पलांदे आत होते. पलांदे यांनी अनिल देशमुख यांच्या केबिनमधून बाहेर आल्यानंतर मुंबईतील ४०-५० कोटी रुपये  १७५० बार,हॉटेल मधून जमा होतील, असं पलांदे म्हणाले. संजय पाटील यांनी मला ती माहिती दिली, असं परमबीर सिंह यांनी पत्रात म्हटलं आहे.

९. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा कऱण्यासाठी टार्गेट द्यायचे.

१०. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते.

Post a Comment

0 Comments