शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात उगवला सुवर्णदिन ३.५२ सीजीपीए गुणांकनासह ‘नॅक’चे ‘अ++’ मानांकन


शिवाजी विद्यापीठास 'नॅक'चे 'अ++' मानांकन जाहीर झाल्यानंतर कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मनोभावे अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, प्रा. आर.के. कामत, प्रा. एम.एस. देशमुख, प्राचार्य क्रांतीकुमार पाटील, प्राचार्य डी.जी. कणसे, प्राचार्य व्ही.एम. पाटील, प्राचार्य मंगलकुमार पाटील, प्रा. व्ही.एस. मन्ने आदी.

कोल्हापूर, दि. ३१ मार्च: ‘नॅक’ (बंगळुरू)च्या चौथ्या पुनर्मूल्यांकनामध्ये येथील शिवाजी विद्यापीठाने ३.५२ सीजीपीए गुणांकनासह ‘अ++’ मानांकन प्राप्त करून सुवर्णाक्षरांत नोंदवावी, अशी कामगिरी केली आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅकच्या चौथ्या पुनर्मूल्यांकन फेरीअंतर्गत नॅक पिअर टीमने १५ ते १७ मार्च २०२१ या कालावधीत शिवाजी विद्यापीठास भेट दिली. नॅकच्या बदललेल्या नव्या निकषांतर्गत गुणांकन करण्यात आलेले शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील दुसरे विद्यापीठ आहे. यामध्ये विद्यापीठाने नॅकला सादर केलेल्या स्वयं मूल्यनिर्धारण अहवालाचे (एसएसआर) सात निकषांवर सुमारे ७०० गुणांचे मूल्यांकन केले जाते. उर्वरित ३०० गुणांचे मूल्यांकन पिअर टीममार्फत करण्यात येते. सात निकषांमध्ये अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापन प्रणाली, संशोधन, नवनिर्मिती व विस्तार, पायाभूत सुविधा व अध्ययन स्रोत, विद्यार्थी सहाय्यता व प्रगती, प्रशासन, नेतृत्व व व्यवस्थापन आणि संस्थात्मक मूल्ये व उत्तम व वेगळे उपक्रम यांचा समावेश असतो. यामध्ये अभ्यासक्रम, विद्यार्थी सहाय्यता व प्रगती आणि उत्तम उपक्रम यामध्ये शिवाजी विद्यापीठाने चमकदार कामगिरी केली आहे. प्रशासनाच्या संदर्भात तर शिवाजी विद्यापीठाची एक स्वतःची अशी परंपरा आहे. प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवारांपासून सर्वच कुलगुरूंनी त्याकामी योगदान दिलेले आहे. विशेषतः डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या काळात नॅक सुरू झाले, तेव्हा त्यांनी या अनुषंगाने उपयुक्त अशी पायाभरणी करण्याचे काम केले. त्यामुळे अवघ्या चारच फेऱ्यांत शिवाजी विद्यापीठाने ‘अ’पासून ते ‘अ++’पर्यंतचा प्रवास केला आहे. संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही निकषांवर विद्यापीठाने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विशेषतः नॅक पिअर टीमने त्यांच्या एक्झिट मिटींगमध्ये शिवाजी विद्यापीठामधील एकजुटीने आणि एकदिलाने काम करण्याच्या प्रवृत्तीचे खुल्या मनाने कौतुक केले, असे त्यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, नॅकचे अ++ मानांकन प्राप्त झाल्यामुळे आपले संशोधक, विद्यार्थी, शिक्षक यांना अनेक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ होणार आहेत. संलग्नित महाविद्यालयांना सुद्धा त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे विद्यापीठ परिक्षेत्रातच नव्हे, तर देशभरातील विद्यापीठाशी संबंधित सर्व घटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. काम करणाऱ्या सर्वांमध्ये नवी ऊर्जा संचारली आहे. मिळालेले यश टिकविणे आणि वृद्धिंगत करणे ही आता आमची जबाबदारी आहे, याची जाणीव आम्हाला आहे. विद्यापीठाच्या या यशामध्ये आजी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, सर्व अधिकार मंडळांचे सदस्य, प्रशासकीय अधिकारी व सेवक, संलग्नित महाविद्यालये, विद्यापीठावर प्रेम करणारे समाजातील सर्व स्तरांतील घटक या सर्वांचा बहुमोल स्वरुपाचा वाटा आहे. यापुढील काळातही सर्वांकडून असेच सहकार्य लाभत राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, आयक्यूएसीचे संचालक डॉ. एम.एस. देशमुख उपस्थित होते. प्रा. आर.के. कामत यांनी नॅकच्या प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी आभार मानले.

‘नॅक’ची बातमी कळताच महाराजांना अभिवादन

आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शिवाजी विद्यापीठास नॅकचे अ++ मानांकन मिळाल्याची वार्ता समजताच कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले आणि कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विविध बैठकांच्या निमित्ताने विद्यापीठात आलेले व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिसभेचे सदस्य, प्राचार्य आणि शिक्षक यांनीही तेथे कुलगुरू डॉ. शिर्के यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. विविध अधिविभागांचे प्रमुख व शिक्षकांनीही कुलगुरूंसह सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. कुलगुरूंनी त्यानंतर मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रत्येक विभागात जाऊन नॅकसाठी परिश्रम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याचे अभिनंदन केले. सायंकाळच्या सत्रात काही अधिविभागांनाही त्यांनी भेटी देऊन शिक्षकांचे अभिनंदन केले.

कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष भेटी टाळण्याचे आवाहन

शिवाजी विद्यापीठास प्राप्त नॅकच्या उच्च मानांकनामुळे सर्वच घटकांना आनंद होणे स्वाभाविक आहे. तथापि, सध्या महाराष्ट्रासह देशात कोविड-१९ची लाट पुन्हा उसळते आहे. या पार्श्वभूमीवर, मान्यवरांनी तसेच नागरिकांनी दूरध्वनी, ई-मेलद्वारे अभिनंदन करावे. प्रत्यक्ष भेटूनच अभिनंदन करण्याची जोखीम टाळावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments