“मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजीबात झालेली नाही”


शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. प्रफुल पटेल आणि शरद पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजीबात झालेली नाही. आता तरी रहस्य कथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही, अशा आशयाचं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या खास मर्जीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे. या भेटीमागचे राजकारण नव्या पिढीला कळणार नाही. शरद पवार आणि अमित शहा यांची गुप्त भेट झाली तर तुमचे कोण गुप्तहेर होते हे माहीत नाही. पण ५० वर्षांच्या राजकीय जीवनात कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी जेवढे मित्र कमावले नाहीत तेवढे मित्र पवार साहेबांनी कमावले आहेत, असं आव्हाड म्हणाले.

दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाची अहमदाबादमध्ये गुप्त चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे. शरद पवार आणि प्रफुल पटेल यांनी अमित शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतल्याचं खळबळजनक वृत्त समोर आलं तेव्हा, ‘सब चीजे सार्वजनिक नही होती’, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शहा यांनी दिल्लीत पत्रकारांना सुचक उत्तर दिलं आहे.

Post a Comment

0 Comments