.…म्हणून भारताचा पराभव झाला - वीरेंद्र सेहवाग


दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या इंग्लंडने भारताला ६ विकेट्सने पराभवाची धूळ चारली. के.एल. राहुलच्या  धमाकेदार शतकावर जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी पाणी फेरलं. जॉनी बेअरस्टोने १२४ धावांची खेळी केली तर स्टोक्सने ९९ धावा फटकावताना १० षटकार लगावले. 

इंग्लंडने हा सामना अतिशय सहज जिंकला. भारताला ३३६ धावा करुनही सामना गमवावा लागला. भारताचा पराभव नेमका का झाला, याचं विश्लेषण करताना भारताचा विस्फोटक माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने नेमकं ‘कारण’ सांगितलं आहे. 

‘क्रिकबज’शी बोलताना वीरेंद्र सेहवागने भारताच्या पराभवाचं विश्लेषण केलं. तो म्हणाला, “भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या फिरकीपटूंना (स्पिनर्सना) त्यांच्या पूर्ण ओव्हर्स टाकू दिल्या. स्पिनर्सविरोधात विरोधात आक्रमक बॅटिंग करण्याची गरज असताना भारतीय बॅट्समन त्यांच्याविरोधात शांत खेळले. 

जर मोईन अली आणि आदिल रशीदविरोधात भारतीय फलंदाजांनी आक्रमक फटके मारले असते तर भारत आणखी २० ते २५ रन्स जोडू शकला असता. म्हणजेच भारताच्या जवळपास ३६० धावा झाल्या असत्या. या लक्ष्याचा पाठलाग करणं इंग्लंडला नक्कीच सोपं नव्हतं”

पुढे बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “इंग्लंडच्या फलंदाजांनी भारताच्या फिरकीपटूंवर आक्रमण केलं. बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टोने भारतीय फिरकीपटूंच्या बोलिंगच्या चिंधड्या उडवल्या. त्यांनी भारतीय फिरकीपटूंना अजिबातच सेट होऊ दिलं नाही. पहिल्या बॉलपासून त्यांनी भारतीय स्पिनर्सविरोधात आक्रमणाची भूमिका ठेवली, त्याच कारणास्तव इंग्लंडला भारतावर पलटवार करणं शक्य झालं.”

Post a Comment

0 Comments