सार्वजनिक बांधकाम विभागातील दोघांना लाच घेताना रंगेहात पकडले


मुंबई : देशातील नागरिकांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी , यासाठी देशभर स्वच्छ भारत उपक्रम राबविण्यात येत आहे . मात्र , त्यात लाचखोर अधिकाऱ्यांमुळे भ्रष्टाचाराची घाण निर्माण झाली आहे . इतके नाही तर त्याची भूक प्रचंड वाढली आहे . स्वच्छ भारत योजनेतील बिल मंजूर करण्यासाठी चक्क बिलाच्या ४५ टक्के लाच मागण्याचा प्रकार समोर आला आहे . लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ विभागीय लेखा अधिकारी आणि भांडारपाल यांना लाच घेताना पकडले आहे . भांडारपाल प्रकाश लक्ष्मण परब ( वय ४५ ) आणि वरिष्ठ विभागीय लेखा अधिकारी बीरेंद्र कुमार सिन्हा अशी दोघांची नावे आहेत . फिर्यादी हे स्वच्छ भारत / स्वच्छ मुंबई यासाठी काम करतात . यामध्ये विविध ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करुन ओला कचऱ्यापासून खत निर्मितीचे काम करतात.

२०१८ पासून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बांद्रा येथील गर्व्हमेंट कॉलनीत प्रायोगिक तत्वावर काम चालू केलेले आहे . त्यातील एका बिलाची रक्कम त्यांना मिळालेली आहे . त्यांच्या उर्वरित बिलाची एकूण रक्कम २१ लाख ९ ३ हजार रुपये आहे . या बिलाची रक्कम मंजूर करवून देण्यासाठी भांडारपाल प्रकाश परब याने बिलाच्या ४५ टक्के इतक्या लाचेची मागणी केली . त्याविरोधात फिर्यादी यांनी ११ जानेवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली . या तक्रारीची पडताळणी १ फेब्रुवारी रोजी करण्यात आली . या पडताळणीत प्रकाश परब याने एकूण बिलाच्या ४५ टक्के म्हणजेच ९ लाख ८६ हजार रुपयांची मागणी स्वत : साठी व वरिष्ठांसाठी केली . लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २४ मार्च रोजी सापळ्याचे आयोजन अंधेरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात करण्यात आले . यावेळी बीरेंद्र कुमार सिन्हा याने त्याच्या हिश्यांची लाचेची रक्कम प्रकाश परब याच्याकडे देण्यास सांगितले . त्याप्रमाणे फिर्यादीकडून स्वत : साठी व वरिष्ठांकरीता ४ लाख २५ हजार रुपये स्वीकारताना प्रकाश परब याला रंगेहाथ पकडण्यात आले .

Post a Comment

0 Comments