सोलापूर! धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी वसिम रिजवी याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी


सोलापूर/प्रतिनिधी:

 सकल विश्वाला शांती अन् मानवतेचा संदेश देणाऱ्या इस्लाम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ ‘ कुराण ‘ मधील आयते हटविण्याची मागणी करणारी याचिका वसिम रिजवी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. वसिम रिजवी यांची ही कृती धार्मिक भावना दुखावणारी असून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रॉयल बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक सादिक नदाफ यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात निवेदन देऊन केली.

वसिम रिजवी यांनी, धर्मग्रंथातील काही वचनांचा विपर्यस्त अर्थ घेऊन, ते धर्मग्रंथातून हटविण्याची मागणी करतांना, इस्लाम धर्म ताकद आणि जबरदस्तीच्या बळावर वाढला आहे. मदरशातून दहशतवादाचे धडे दिले जातात, असा धार्मिक भावना दुखावणारा संतापजनक आरोप करताना, ती वचने धर्मग्रंथातून हटविण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे.

चौदाशे वर्षापूर्वी अवतरीत झालेली अस्मानी किताब, म्हणून ‘ कुराण ‘ कडे श्रद्धा भावनेने पाहिलं जातं. ज्यातील एक शब्दही आजपर्यंत बदल झालेला नाही. या ग्रंथाकडे इस्लामचा प्राण म्हणून पाहिलं जाते. त्यातील २६ वचने दहशतवादाला खतपाणी घालतात, असा वसिम रिजवी यांचा आरोप निराधार तसेच देशातील शांततेला बाधा पोहोचवणारा असल्याचे रॉयल बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे संस्थापक सादिक नदाफ यांनी म्हटले.

देशातील सामाजिक स्वास्थ्य बिघडू पाहणाऱ्या वसीम रिजवी यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन रॉयल बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सुन्नी जमाती उलमा- शाखा सोलापूर, जमजम सामाजिक संस्थेच्या वतीने सदर बझार पोलिस ठाण्यात देण्यात आले.

यावेळी हाफिज फय्याज पठाण, दौला कुमठे, मुस्ताक लालकोट, इरफान बेपारी, मोहम्मद अली कुरेशी, इजाज नदाफ आणि हाफिज तौफिक खैरदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments