किरणराज घोडके यांचे लोकनेते शरद पवारांना पत्र!

पंढरपूर/प्रतिनिधी:

विधानसभा पोटनिवडणुकीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासद व कामगारांना फसवणाऱ्यांना उमेदवारी देऊ नये यासाठी अनवली गावचे सुपुत्र किरण पुरुषोत्तम यांनी शरद पवार साहेबांना पत्र लिहून मागणी केली आहे.या पत्रात त्यांनी पुढीलप्रमाणे विनंती केली आहे.

आदरणीय साहेब. आपणांस पत्र लिहिण्यास कारण काय आहे हे आपण जाणताच.उभा महाराष्ट्र ज्या माणसाला शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणून ओळखतो त्या लोकनेत्याला पंढरपुर मंगळवेढा मतदार संघात सुरू असलेला गोंधळ आणि विठ्ठल कारखान्यावर झालेल्या आर्थिक बलात्काराबाबत माहिती नाही असं होऊच शकत नाही.तरीही मी राष्ट्रवादी पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदाचा मुलगा या नात्याने काही विनंत्या आपल्याकडे करत आहे.

१) पंढरपुर तालुक्यातील बहूजन समाजाने नेहमीच आपल्यावर व राष्ट्रवादी पक्षावर प्रेम केले आहे.इथला शेतकरी आणि कामगार तुम्हाला दैवत मानत आले आहेत.पण आज काही हंगामी निष्ठावंत राष्ट्रवादी पक्षाच्या व तुमच्या नावाखाली इथल्या सर्वसामान्य जनतेला लुटण्याचे व स्वतःची केलेली पापं झाकण्याचा प्रयत्न करत आहेत.पक्षासाठी पद आणि प्रतिष्ठेचा विचार न करता झोकून देऊन काम करणाऱ्या निष्ठावंत लोकांना डावलून स्वतःच्या गटातील व ऐकण्यातील लोकांना पदावर नियुक्त करून पक्षाला विकलांग बनवण्याचा निर्धार काही लोकांनी केलेला आहे.

२) पंढरपुर-मंगळवेढा मतदारसंघाचा आत्मा म्हणून ओळखला जाणारा विठ्ठल सहकारी साखर कारखाना आज अखेरच्या घटका मोजत आहे.या कारखान्याच्या माध्यमातून हजारो लोकांचा प्रपंच उभा आहे.सदर कारखान्यावर आर्थिक बलात्कार करणाऱ्यांना आपण आश्रय देऊ नये.

३) विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळ यांनी सभासद व वाहतूकदारांच्या नावावर परस्पर कर्ज काढून फसवणूक केली आहे.

४) पक्षाच्या पडत्या काळात जिवाचं रान करून पक्षाला ताकद देण्याचं काम इथल्या सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि कार्यकर्त्यांनी केलं आहे.तुम्ही पक्षाचा उमेदवार म्हणून दगड जरी उभा केला तरी निवडून देण्यासाठी जिवाचं रान करू या भावनेने २०१९ च्या निवडणुकीत ऐनवेळी प्रवेश केलेल्या कै.आ.भारत नाना भालकेंना प्रचंड बहुमताने निवडून दिले.

५) परंतु तद्नंतर ही पक्षातील निष्ठावंत दुर्लक्षित आणि विठ्ठल परिवारातील सभासद, शेतकरी हक्कापासून वंचित राहिले.

६)आता जर आपण विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आर्थिक बलात्कार करणाऱ्यांना विधानसभेचे तिकीट दिल्यास इथल्या सर्वसामान्य जनतेच्या आपल्यावरच्या विश्वासाला ठेच लागेल.इथला कामगार आणि सभासदांच्या नजरेत आपल्याबाबत असलेली आपुलकी आणि निष्ठा ढासळेल.

७) सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून असलेली आपल्या पक्षाची प्रतिमा डागाळेल. कर्तृत्वशून्य लोक आज सहानुभूती च्या नावाखाली स्वार्थाची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत.

८) काहीही झालं तरी आपण आमच्या सारख्या गोरगरीब जनतेला, सर्वसामान्य सभासद व कामगारांना फसवणाऱ्या व विठ्ठल कारखान्यावर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला विधानसभा निवडणुकीचं तिकीट देऊ नये.

९) तुम्ही नेहमीच लोकहिताचे निर्णय घेता त्यामुळे मला पुर्ण विश्वास आहे की यावेळी सुद्धा आपण पक्षहित आणि लोकहित पाहून आमच्या अडचणींना आणि परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या लोकांच्या बाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा.

१०) तरीही आपल्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता म्हणून मी आज आपणास हक्काने सांगेन की,जर आपण आमच्या सारख्या हजारो लोकांच्या स्वर्ग म्हणजे विठ्ठल कारखना बुडवणार्या , आणि शेतकऱ्यांना व कामगारांना फसवणाऱ्याला जर उमेदवारी दिली तर आपण इथे प्रचाराला येण्याआधी आम्हाला कर्जमुक्त करून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या हिताचे निर्णय घेऊन व जाहीर करूनच यावे. अन्यथा या लबाड लोकांना व फसवणूक करणार्या लोकांना पाठीशी घालण्याचे पाप आपल्या माथी आल्याशिवाय राहणार नाही.
मला फक्त अपेक्षाच नव्हे तर संपूर्ण खात्री आहे की आपण आमच्या या अडचणींचा आणि मागण्यांचा विचार नक्कीच कराल.कारण आमची बांधिलकी विचारांशी आहे,आमची बांधिलकी पवारांशी आहे.आणि आदरणीय जाणते राजे व लोकनेते म्हणून आपण आपल्या लेकरांना कधीही उघडं पडू देणार नाही.
कळावे.

आता आदरणीय शरद पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्ते व सर्वसामान्य सभासदाच्या पोरांच्या मताला किंमत देऊन न्याय देतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments