प्रा.डॉ. प्रभाकर माने/ शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :
डी.आर.माने महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटना,एन.सी.सी. व महाराष्ट्र विवेकवाहिनी या देश व सामाजिक सेवेचे व्रत घेतलेल्या या ऊर्जावान विभागाकडून 'होळी लहान पोळी दान' या समाजाभिमुख उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रवीण चौगले यांच्या प्रेरणेने व नेतृत्वाखाली सातत्याने देश व समाज सेवेशी संबंधित उपक्रमांचे सातत्याने मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येत असते. त्यात सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय म्हणजे समाज घटकांशी नाळ बांधून नियोजन करण्यात येत असते. अशाच या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन गेल्या १० वर्षापासून अखंडितपणे हे सेवारुपी कार्य सुरू आहे. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून या उपक्रमांतर्गत कागल येथील 'देवचंद शहा बालगृह' कागल(बोर्डिंग) येथे गावोगावी पुरणपोळ्या संकलित करून त्याचे वाटप या बालगृहामध्ये राहणाऱ्या अनाथ मुलांना देऊन मानवतावादी कार्य केले आहे.
सन २०१० पासून महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विवेक वाहिनीच्या वतीने मानवतावादी विचार व संस्काराची बीजे विद्यार्थ्यांच्या मनात पेरली गेली.तेव्हापासून सातत्याने हा उपक्रम सुरू असून यंदा या उपक्रमास ११ वर्ष पूर्ण होत आहेत.
होळी लहान पोळी दान या उपक्रमांतर्गत साके, बामणी, सिद्धनेर्ली, करनूर इत्यादी गावातील समाजकार्याच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या या विद्यार्थ्यांनी गावांमध्ये जाऊन गावातील लोकांचे यथोचित प्रबोधन करण्यात आले.त्याचा परिणाम म्हणून प्रत्येक गावांमधून लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पोळ्या दान केल्या तसेच होळीमध्ये नैवेद्य म्हणून जळणाऱ्या पोळ्या ऐवजी त्या एकत्रित करून सर्व पुरणपोळ्या गरजू,गरीब मुलांना व लोकांना देऊन त्यांच्या चेहऱ्यावर होळी सणाचा आनंद फुलवून त्यांच्यात सहभागी होऊन आनंद द्विगुणित करण्यात आला.या वेळी वंदूर येथील वृद्धाश्रम, ऊस तोडणी मजुर व अनाथाश्रमातील मुलांना या पुरणपोळ्या खाऊ घालण्यात आले.
या उपक्रमामध्ये डी.आर.माने महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संघ, एन.सी.सी. विभाग व महाराष्ट्र विवेक वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या रचनात्मक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून इतर विद्यार्थ्यांना व समाजातील घटकांना प्रेरणादायी असे हे कार्य आहे.
सदर कार्यक्रमात महाविद्यालयाचे विवेक वाहिनी प्रमुख प्रा. डॉ. आदिनाथ गाडे ,प्रा. आबासाहेब चौगले , प्रा.डॉ. संतोष जेठीथोर, माजी विद्यार्थी संघाचे कार्यशील अध्यक्ष नेताजी बुवा, सचिव विवेक पोतदार, खजानिस विनायक सातुसे यांच्यासह हेमंत बन्ने, हरी आवळे,पवन गुरव ,आजी माजी विद्यार्थी व एनसीसीचे असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments