"गुणवत्तापूर्ण मनुष्यबळनिर्मितच्या आधारे देशाच्या मनुष्यबळ गुणवत्तेची प्रतिष्ठा वाढणार:प्रा.डॉ. महावीर बुरसे"

प्रा.डॉ.प्रभाकर माने/ शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :

जयसिंगपूर कॉलेजमध्ये भारतातील वाढत्या लोकसंख्येचे औचित्य साधून अर्थशास्त्र विभागाच्या वतीने "लोकसंख्या जागरुकता व नियंत्रण" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
          
जयसिंगपूर कॉलेजच्या अर्थशास्त्र विभागा मार्फत सातत्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. मात्र भारतीय शिरगणती २०२१च्या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक लोकसंख्या जागरूकता या विषयाच्या अनुषंगाने प्रा.डॉ. महावीर बुरसे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सुरुवातीस अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून विद्यार्थ्यांच्या मध्ये वाढत्या लोकसंख्येची जनजागृती व त्यावर नियंत्रण करण्यासाठी शासन व विद्यार्थ्यांची नेमकी कोणती भूमिका असावी याबाबत प्रबोधन करण्यासाठी हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
       

जयसिंगपूर कॉलेजचे प्रा.डॉ. महावीर बुरसे या विषयावर भाष्य करताना म्हणाले की, आपण सर्वजण लोकसंख्येबाबत फक्त चर्चा करीत राहतो परंतु या लोकसंख्येतील वाढ  ही संख्यात्मक आहे की गुणात्मक आहे याबाबत आपण सर्वजण अनभिज्ञ असतो त्यामुळे लोकसंख्येबाबत आपण फारसे जागरूक नसतो.मात्र भारताची लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे याबाबत आपण विनोदी बाजूने चर्चा करीत राहतो त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचे गांभीर्य ना जनतेला ना सरकारला आहे. मात्र लोकसंख्या विषयाबाबत जी तळमळ व जागरुकता विदेशात व चीन सारख्या शेजारच्या देशात आहे त्याचं गांभीर्य आपल्या देशातील नागरिकांना व राज्यकर्त्यांना नाही यामुळे सातत्याने लोकसंख्येमध्ये वाढ होत चालली आहे.या वाढत्या लोकसंख्येचा दुष्परिणाम म्हणून असंख्य प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे मात्र या देशातील राज्यकर्ते या देशातील समस्या व प्रश्नांची सोडवणूक करण्यापेक्षा प्रत्येक समस्येचे मूळ कारण लोकसंख्या आहे अशा प्रकारचा दिंडोरा वाजवत या देशातील जनतेची दिशाभूल करीत आहेत.
         

पूर्वी लोक अशिक्षित असल्यामुळे राज्यकर्त्यांनी सांगितलेले लोक निमूटपणे ऐकत होते मात्र काळानुरूप सुशिक्षितांचे प्रमाण वाढले असून त्यांनी वेळीच वाढत्या लोकसंख्येचे गांभीर्य लक्षात घेऊन लोकसंख्येविषयी स्वतःमध्ये व समाजात जागृती करून लोकसंख्येवर नियंत्रण ठेवावे.यासाठी राज्यकर्त्यांना लोकसंख्या विषयी योग्य धोरण आखण्यास व त्याची अंमलबजावणी करण्यास प्रवृत्त करावे अशा प्रकारचे मत डॉ.बुरसे यांनी मांडले.
        
 सरतेशेवटी आपल्या भाषणात ते म्हणाले की या देशातील मानव विकास निर्देशांक जागतिक पातळीवर उच्च गुणवत्ता पूर्ण करावयाचा असेल तर यासाठी सरकारने विद्यार्थीदशेतच लोकसंख्येविषयक माहिती व ज्ञान देऊन त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.यासाठी शालेय जीवनापासून त्याची सुरुवात करावी याकरिता अभ्यासक्रमामध्ये त्याची जाणीवपूर्वक समावेश करावा ज्यामुळे त्याचं गांभीर्य विद्यार्थ्यांना कळेल व त्याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांच्या कौशल्य व गुणवत्तापूर्ण निर्मितीच्या आधारे देशाच्या मनुष्यबळ गुणवत्तेची प्रतिष्ठा वाढणार आहे यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील होणे गरजेचे आहे.
        
या कार्यक्रमाचे आभार डॉ.व्ही बी.देवकर यांनी मानले.तसेच या कार्यक्रमाचे सूत्रबद्ध व उत्तम सूत्रसंचालन प्रा.सौ. स्वाती माळकर यांनी केले. या कार्यक्रमात प्रा.मेहबूब जीवन आवळे, गणेश कुरले व अर्थशास्त्र विषयाचे असंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते.  विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत मनस्वी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments