देशीदारूचा टेम्पो पेटला, १३ लाखांचा मुद्देमाल खाक डोंगरगाव शेलाटी फाटा येथील घटना : वीजेच्या खांबावर आदळल्याने लागली आग


 पिशोर येथून जवळच असलेल्या डोंगरगाव शेलाटी फाट्याजवळ नाचनवेल रस्त्यावर देशीदारूने भरलेला टेम्पो विजेच्या खांबावर आदळून वीजतारांच्या घर्षणामुळे टेम्पोला आग लागली. यात वाहनासह संपूर्ण देशी दारूचा जळून कोळसा झाल्याची घटना रविवारी (दि.२८) दुपारी घडली.  

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार वाहन क्र. एमएच-२० डीई- ४२५१ मधून चिंचोली व भराडी येथील दुकानासाठी देशीदारू भरून बाबरा-नाचनवेल रस्त्यावरून जात असताना डोंगरगाव-शेलाटी फाट्यानजीक असलेल्या वळणावर चालक गणेश कळम याचा टेम्पोवरील ताबा सुटला. रस्त्याच्या बाजूला विजेचा पुरवठा करणार्‍या मुख्य खांबावर टेम्पो जाऊन आदळला. यामुळे तार तुटून टेम्पोवर पडल्याने खोक्यातील काही बाटल्या फुटल्या. तार पडल्याने काही क्षणातच दारूने पेट घेतला. 

चालक कदम याने वाहनातून उडी घेतली त्यामुळे जीवितहानी टाळली. बघता बघता संपूर्ण दारूच्या खोक्यांसह वाहनाचा कोळसा झाला. य घटनेची माहिती मिळताच, पिशोर पोलीस ठाण्याचे सपोनि बालाजी वैद्य यांनी सहा उपनिरीक्षक माधव जरारे, चालक सरवर पठाण यांच्यासह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. देशीदारू पुरवठादार नरेंद्र जैस्वाल हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. या आगीत सुमारे १० लाखांची देशी दारू तसेच टेम्पो असे सुमारे १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याचे सपोनि वैद्य यांनी सांगितले. पिशोर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments