" शिरोळ तालुक्यात शिक्षक मतदारसंघासाठी ८४.६५ व पदवीधर साठी ६८.४८ टक्के मतदान"

प्रा.डॉ.प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी

मंगळवार दि.१ डिसेंबर २०२० रोजी शिरोळ तालुक्यात  पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदार संघासाठी झालेले  मतदान शांततेत पार पडले.शिक्षक मतदारसंघासाठी ८४.६५ व पदवीधर साठी,६८.४८ टक्के  मतदान झाले.
               
तालुक्यात शिक्षक मतदार एकूण संख्या १०४९ होती त्यापैकी मतदान पुरुष संख्या ६५४ व स्त्री मतदार संख्या २३४ असे एकूण ८८८ मतदात्यांनी मतदान केले.तसेच पदवीधर मतदारसंघासाठी  एकुण मतदार संख्या १०८१६ पैकी पुरुष व स्त्री मतदारांनी अनुक्रमे ५४१५ व १९१२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.
                  
शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर,शिरोळ, नांदणी,शिरढोण, नृसिंहवाडी, कुरुंदवाड व दत्तवाड या सात केंद्रावर शिक्षक व पदवीधर निवडीसाठीची मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक केंद्र हे सॅनिटाईज करून केंद्रावर प्रत्येक अधिकाऱ्यांना,कर्मचाऱ्यांना व मतदारांना कोरोना सुरक्षितेसाठी मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले होते.तसेच आरोग्य विभागाच्या वतीने हात सॅनिटाईज करणे,ऑक्सिजन पातळी व तापमान मोजण्याची व्यवस्था अत्यंत चोख करण्यात आली होती. प्रत्येक मतदारावर अचूक लक्ष ठेवून दक्षता म्हणून कोरोनाची काळजी आरोग्य कर्मचाऱ्याकडून घेतली जात होती. यासाठी प्रत्येक केंद्रावर  आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती. इतके सुंदर व सुरक्षित नियोजन तालुका आरोग्य विभागाने केले होते.
    
याचबरोबर शिक्षकांसाठी ७ व पदवीधरसाठी २६ मतदान केंद्रावरील मतदान अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे निवडणूक प्रक्रियेचे काम करून निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे राबविली. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस विभागाने अहोरात्र पणे आपले कर्तव्य पार पाडले.त्याचा परिणाम म्हणून कोणत्याही केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही ही सर्वात आनंदाची बाब होय.
                  
शिरोळ तहसीलदार डॉ.सौ. अपर्णा मोरे-धुमाळ यांच्या मार्गदर्शनानुसार,त्यांच्या अत्यंत सुनियोजित पद्धतीमुळे व सर्व निवडणूक घटकांकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली. मतदान प्रक्रियेमध्ये नायब तहसीलदार संजय काटकर,गटविकास अधिकारी कवितके,तालुका वैद्यकीय अधिकारी पी.एस.दातार यांनी सहाय्यक कामे उत्तमपणे पार पाडली. ३ डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालाची उत्सुकता सर्व घटकांना लागुन राहिली आहे.

Post a Comment

0 Comments