पत्नीची गळा दाबून हत्या करून तिचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे नाट्य रचणाऱ्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. दिनेश छटीलाल पाल (वय ३०, रा. टेंभरी, जि.नागपूर ) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर पत्नी सुषमाची (वय २८, रा. टेंभरी ) हत्या केल्याचा आरोप आहे. शारीरिक संबंधास नकार देत असल्याने दिनेशने सुषमाची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , दिनेश हा मूळ मध्य प्रदेशातील रहिवासी आहे. गेल्या काही काळापासून तो पत्नी व मुलांसह टेंभरी गावात वास्तव्यास आहे. तो इंडोरामा कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आठ वर्षांपूर्वी दिनेश व सुषमा यांचे लग्न झाले. त्यांना अनुक्रमे सात, पाच आणि दोन वर्षे वयाची तीन मुले देखील आहेत. सदर घटना एम.आय.डी.सी. ( बुटीबोरी ) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा टेंभरी येथे २८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दरम्यान घडली आहे
गेल्या काही दिवसांपासून सुषमा दिनेशला शरीर संबंधास सातत्याने नकार देत असल्याने त्यांच्यात वाद सुरू होते. यापूर्वीही दिनेश याने तिला मारहाण केल्याचे शेजाऱ्यांकडून सांगितले जात आहे. शनिवारी, २८ नोव्हेंबर रोजी त्यांच्यात याच मुद्द्यावर परत एकदा भांडण झाले आणि रागाच्या भरात दिनेशने सुषमा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर सुषमाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला असा बनाव केला. परंतु, सुषमाच्या शवविच्छेदनाच्या अहवालात तिचा मृत्यू हृदय थांबल्याने नाही तर गळ दाबल्याने झाल्याचे समोर आले आणि दिनेशला अटक करण्यात आली .
पोलिसांनी दिनेशला ताब्यात घेतले व त्याला पोलिसी हिसका दाखविताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि या कृत्यामागचे कारणही स्पष्ट केले. पोलिसांनी दिनेशवर हत्येच्या आरोपाखाली भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय सुषमाच्या मृत्यूचे खोटे कारण पुढे केल्याच्या आरोपाखाली भादंविच्या कलम १७७ अन्वयेसुद्धा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक दिनकर दराडे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
0 Comments