धनगराची मेंढरं गा...


✒️मिस्टर रजनी
(पत्रकार,कवी,लेखक)
misterajni@gmail.com

सुगीचे दिवस सुरु झाले की सगळी शिवारं मोकळी होतात.आणि मग जागोजागी असे मेंढरांचे कळप दिसू लागतात.मेंढरांच्या कळपासोबत दोन मेंढपाळ,एक मागं एक पुढं आणि त्यांच्या सोबत मान खाली घालून जाणारी मेंढरं.किती प्रामाणिक असतात ही मेंढरं ? मालक जिकडं जाईल तिकडं चालायला लागतात.अगदी विश्वासानं.तेही एकमेकाला सोबत घेऊन.बरंच काही शिकता येईल या मेंढरांकडून माणसांना…

या मेंढरांना बघितलं की मला मराठी शाळेतले दिवस आठवतात.हो,म्हणजे जेव्हा मास्तर प्रभातफेरी काढायचे तेव्हा आम्हीही असेच एका रांगेत रस्त्याच्या एका बाजुनं त्या मेंढरांसारखंच मान खाली घालून चालायचो.पुढे दोन मास्तर,मागे दोन.सोबत बाई पण असायच्या.सगळा गाव फिरुन यायचो आम्ही, न कळणाऱ्या घोषणा देत.पण,आमच्या प्रभातफेरीमुळे किती लोकं जागरुक झाली आणि किती लोकांचं भलं झालं काय माहिती नाही …?पण,आमचे पाय मात्र कायम दुखायचे…
मग,प्रश्न असा पडतो की दिवसभर फिरुन या मेंढपाळांचे पाय दुखत नसतील काय…?

त्यांच्यासोबत त्यांचे खाजगी सुरक्षा रक्षकही असतात म्हणजेच त्यांचे शिकाऊ कुत्रे.ती दिसायला खुपच भयानक असतात.म्हणजे कळपाच्या आसपास जरी गेलात तरी लचका तोडतील की काय अशी भिती वाटल्याशिवाय राहत नाही…
कधी कधी त्यांच्या सोबत त्यांची मुलंही असतात.ती शाळेला जात नसली तरीही त्याची शाळा मात्र भरलेली असते.कधी माळरानावर, कधी शिवारात कधी धरणाच्या बाजुनं,कधी डोंगर कपारीत तर कधी आणि कुठे तरी…
हिरवागार निसर्ग,पानं,फुलं,झाडं,डोंगर,नदी,खळाळून वाहणारे झरे आणि कुठलाच ठावठिकाणा नसलेल्या रानवाटा ज्या कधीच संपत नाहीत…नुसतंच चालणं…
पण,सूर्य मावळतीला गेल्यानंतर तो उद्या पुन्हा येईपर्यंत आपणंही थांबणं गरजेचं असतं.या नियमानुसार मग दिवसभर मेंढरांसोबत फिरुन झाल्यानंतर कुठेतरी पिकं कापून मोकळ्या झालेल्या शेतात एखादा छोटासा तंबु उभारला जातो.किंवा काही वेळा शेताचे मालक मुद्दामहून मेंढरांचा कळप आपल्या शेतात बसवतात.त्याचं कारण,असं की त्यामुळे मेंढरांची विष्ठा शेतात आपसुकच पसरली जाते व त्यामुळे शेतीला खत मिळते.याबदल्यात शेताचा मालक मेंढपाळांची त्या रात्रीची जेवणाची सोय करतो किंवा त्यांना जीवनावश्यक वस्तू देतो…
दिवसभर दमून भागून आलेली मेंढरं एका जागी शांत बसतात.जंगली जनावरं आणि भटक्या कुत्र्यांपासून मेंढरं सुरक्षित रहावी म्हणून सगळ्या मेंढरांच्या भोबती मेंढपाळ जाळी बांधतात.राखणीसाठी त्यांचे सुरक्षारक्षक तैनात असतातच.

खरं तर कुत्रा हा प्राणी खुपच भारी वाटतो मला.त्याला भाकरीचा एक तुकडा दिला तर रात्रभर तो घराची राखण करतो.खरंच,राजकारण्यांपेक्षा कुत्रा खुपच इमानदार वाटतो मला…

असो,

मेंढरांची अगदी पोटच्या पोरांसारखी काळजी घेतात मेंढपाळ.कधी कधी नवीन पिले जन्मास येतात.मग ती चालायला लागेपर्यंत त्यांना कडेवर घेऊन प्रवास सुरुच राहतो…
झोप तर लागतच नसावी त्यांना.ज्यांची स्वप्नं उघड्यावर असतात त्यांना झोप कशी बरं येईल…?

आज इथं,उद्या तिथं तर परवा आणि कुठेतरी,जिथं वस्ती पडेल तिथं यांचं जगणं चालू असतं…

अविरतपणे…



Post a Comment

0 Comments