करमाळा पोलीसांचे तालुक्यातील जनतेला आवाहन


करमाळा/प्रतिनिधी:

दोन दिवसापूर्वी लिंबेवाडी शिवारामध्ये एका व्यक्तीला ठार केल्यानंतर आज दिनांक ५ डिसेंबर रोजी संध्याकाळच्या वेळेस अंजनडोह शिवारात एका महिलेला बिबट्याने ठार केलेले आहे. ठार करण्याची पद्धत व खाण्याच्या पद्धतीवरून दोन्हीकडचा बिबट्या एकच असल्याचे स्पष्ट दिसून येते. अशी घटना घडू नये म्हणून काल दिनांक ४ डिसेंबर रोजी मी बिबट्यापासून बचावाच्या काही सूचना व्हाट्सअप ग्रुप वरती व्हायरल केल्या होत्या. परंतु असे निदर्शनास आले आहे की, सूचनांचे पालन कोणीही करत नसून स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. तरी सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन आहे की, ज्या सूचना पोलीस व वन खात्यामार्फत दिल्या जात आहेत त्याचे तंतोतंत पालन करावे. बिबट्याच्या हल्ल्यात आज ठार झालेली महिला देखील दुपारी ४.०० वाजल्यानंतर घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या लिंबोणीच्या बागेमध्ये लिंबे वेचण्यासाठी गेली असता सूर्यास्ताच्या वेळेस हा प्रकार घडला आहे. वास्तविक पाहता मी काल दिलेल्या सूचनांमध्ये दुपारी ४.०० वाजल्यानंतर जास्त सतर्क राहावे असे कळवले होते. परंतु काही लोक या बाबी सहजतेने घेत आहेत असे दिसून येते. तरी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन आहे की, कोणीही अशा प्रकारचा धोका पत्करू नये.
(Advertise)

काल व आज दिवसभर असेही आढळून आले आहे की, काही लोक जुने फोटो व व्हिडिओ टाकून वनखात्याची व पोलीस खात्याची दिशाभूल करत आहेत. एखाद्या भागात खरंच बिबट्या दिसला असेल तर अवश्य वनखात्याला व पोलीस खात्याला कळवावे, परंतु जुने फोटो व व्हिडिओ टाकून दिशाभूल करून अफवा पसरवू नयेत. दिशाभूल केल्यामुळे बिबट्याला शोधण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. अशी दिशाभूल करुन अफवा पसरवल्यास भारतीय दंड विधान संहितेप्रमाणे गुन्हा दाखल होतो याची जाणीव सर्व नागरिकांना असावी.
(Advertise)

जनतेमध्ये जनजागृती करणे हे सजग नागरिकांचे व समजदार लोकांचे काम आहे. *परंतु काही लोक नागरिकांमध्ये दक्षता घेण्याबाबत कोणतीही जनजागृती न करता प्रशासनाला दोष देण्यामध्ये धन्यता मानत आहेत हे देखील दोन दिवसात स्पष्ट दिसून आले आहे.*अशा लोकांनी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करून बिबट्याच्या धोक्यापासून लोकांना वाचवावे व प्रशासनाची मदत करावी, कारण ही वेळ प्रशासन आणि जनतेने सर्वांनी मिळून काम करण्याची आहे.

Post a Comment

0 Comments