राष्ट्रवादीचे हे .. मोठे नेते भाजपात येणार होते - नारायण राणे


माजी मुख्यमंत्री व राज्यसभा सदस्य नारायण राणे हे महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडत असून आज राणे यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे वळवला.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं नसतं तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तुम्हाला आज भाजपात दिसले असते, असा दावा करतानाच जयंत पाटील यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चाही झाली होती, असा गौप्यस्फोट राणे यांनी केला. जयंत पाटील यांना मी त्यांच्या इस्लामपुरात जाऊन उत्तर देणार आहे. त्यांच्याबाबत जी माझ्याकडे माहिती आहे ती मी तिथेच उघड करणार आहे, असेही राणे म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीलाच नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि करोनाही आला, असे सांगत हे संकट हा मुख्यमंत्र्यांचा पायगुण असल्याचा टोला राणे यांनी लगावला होता. त्याआधीही राणे यांनी अनेकदा हे सरकार निष्क्रीय आहे, हे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी वक्तव्ये केलेली होती. त्याचा अकोला येथे बोलताना जयंत पाटील यांना समाचार घेतला होता.

Post a Comment

0 Comments