पांगरी पोलीसांनी रस्ता भटकलेल्या दोन मूकबधिर मुलींना दिले त्यांच्या आजोबांच्या ताब्यात


पांगरी/ प्रतिनिधी:

पांगरी पोलिसांनी रस्ता भटकलेल्या दोन मूकबधिर मुलींना २४ तासाच्या आत त्यांच्या आजोबांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ३ डिसेंबर रोजी रात्री ८.०० वा.चे सुमारास वालवड ता.बार्शी येथे दोन लहान मुली ग्रामस्थांना गावात फिरताना दिसून आल्या. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांना काही बोलता येत नव्हते.
(Advertise)

वालवड गावातील ग्रामसुरक्षा दल,गावच्या पोलीस पाटील मृणालिनी सुहास भालेराव व सुहास रामा भालेराव यांनी त्या दोन मुलींना घेऊन पांगरी पोलिस स्टेशन गाठले. पांगरी पोलिस स्टेशन येथे पोलीसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून काही एक माहिती मिळाली नाही.

त्यानंतर पोलीस स्टेशन कडून त्या दोन मुलींचे फोटो व त्यांच्या बाबत इतर माहिती पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील व इतर सर्व ग्रुप वर पाठवण्यात आली.सदर मेसेज चे अनुषंगाने पाथरी ता. बार्शी येथील पोलीस पाटील शंकर उत्तम गायकवाड यांनी प्रतिसाद दिला व त्या मुली पाथरी येथे मागील चार वर्षा पासून वास्तव्यास असलेले दगडफोड कामगार माणिक साहेबा शिंदे रा. नाथापूर ता. जि. बीड यांच्या नाती असल्याचे सांगितले.त्यांना तात्काळ पोलीस ठाण्यात बोलावून माणिक साहेबा शिंदे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, त्या मुली दिनांक ३ डिसेंबर दुपारी २ वाजल्यापासून घरी दिसत नव्हत्या.त्यामुळे आम्ही त्यांचा इतरत्र तपास घेतला परंतु त्या मिळून आल्या नाहीत.त्यांची नावे मालन सुरेश शिंदे वय १२ वर्षे व संगीता सुरेश शिंदे वय १० वर्ष अशी आहेत. त्यांना बोलता येत नसून त्यांना मराठी भाषा समजत नाही असे सांगितले.त्या दोन मूकबधिर मुलीं या माणिक साहेबा शिंदे यांच्या नाती असल्याचे खात्री झाल्यानंतर त्यांना त्यांचे ताब्यात देण्यात आले.
(Advertise)

सदर कारवाई मध्ये पांगरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांचे मार्गदर्शनाखाली  अर्जुन कापसे,फिरोज तडवी,बोदमवाड, उर्वते, वालवड गावच्या पोलीस पाटील मृणालिनी सुहास भालेराव,सुहास रामा भालेराव, ग्रामसुरक्षा दल वालवड,शंकर उत्तम गायकवाड (पोलीस पाटील पाथरी) यांच्या सहकार्याने व कार्य तत्परतेने त्या दोन मुलींना २४ तासाच्या आत त्यांच्या कुटुंबियांना पर्यंत पोहोचविण्यात आले.

Post a Comment

0 Comments