पांडे गावात खळबळ : टाचणी खुपसलेले लिंबू,उलटी टांगलेली बाहुली,नारळ, बांगड्या, चोळी-खण..!


करमाळा/प्रतिनिधी:

अंधश्रद्धाविरोधी कायदा होऊनही शहरी व ग्रामीण भागात आजही करनी, भानामती, चेटूक आदी प्रकार घडत असल्याचे दिसून येते. हा प्रकार रात्रीच्या अंधारात अज्ञातांकडून होत असल्याने संबंधित अघोरी प्रकार कोणी केला, हे दिसून येत नाही. असेच प्रकार पांडे (ता. करमाळा) गावात गेल्या चार-पाच दिवसांपासून घडत आहेत. गावातील मध्यवर्ती ठिकाणी व शेतामध्ये टाचणी खुपसलेले लिंबू, उलटी टांगलेली बाहुली, लिंबू, हळदी – कुंकू, नारळ, बांगड्या, चोळी – खण आदी वस्तू आठडाभरात दोन ठिकाणी आढळून येत असल्याने गावात खळबळ उडाली आहे.

पांडे गावातील शॉपिंग सेंटरच्या गाळ्यासमोर तसेच ज्ञानदेव क्षीरसागर यांच्या शेतामध्ये टाचणी खुपसलेले लिंबू, उलटी टांगलेली बाहुली, लिंबू, हळदी – कुंकू, नारळ, बांगड्या, चोळी – खण आदी वस्तू आठडाभरात दोन ठिकाणी आढळून आल्या आहेत. त्यामुळे अंधश्रद्धा पुन्हा डोके वर काढत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या पाच ते दहा वर्षांपासून गावात देवऋषीचे उतारे बंद झाले होते. परंतु, पुन्हा गेल्या आठवड्यापासून देवऋषीचे उतारे आढळून आले आहेत. ज्ञानदेव क्षीरसागर यांच्या शेतामध्ये हळदी – कुंकू लावून, लिंबूला टाचण्या खुपसलेल्या, शिजवलेला भात, नैवेद्य, उलटी लटकवलेली बाहुली टाचण्या लावून झुडपाला बांधलेली दिसली. तसेच गावातील शॉपिंग सेंटरच्या गाळ्यासमोर हळदी – कुंकू, टाचणी लावले लिंबू ठेवलेले आढळून आले. शेतामध्ये जनावरे चरत असताना टाचण्या असलेले नैवेद्य जनावरांनी खाल्ले तर जनावरांना इजा होऊ शकते. त्यामुळे अशा देवऋषींचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

असे उतारे काढून टाकल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशी कृत्ये करणाऱ्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments