"छ.संभाजीनगरमध्ये अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ व भीम आर्मी संघटना यांच्यावतीने भारतरत्न डॉ.आंबेडकराना विनम्र अभिवादन"

प्रा.डॉ. प्रभाकर माने/ शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून छ.संभाजीनगरामधील अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ व भीम आर्मी संघटना यांच्यावतीने आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. यावेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विनायक गायकवाड  व चंदू भंडारे यांनी संयुक्तपणे आपले विचार प्रकट करताना डॉ.बाबासाहेबांनी आपले आयुष्य सकल मानवतेसाठी खर्ची घातले असून समाजातील प्रत्येक घटकाला त्याचा उपयोग व्हावा यासाठी ते प्रयत्नशील होते त्यामुळे बाबासाहेब हे फक्त दलित समाजासाठी काम करतात अशा प्रकारची संकुचित भावनांचा अपप्रचार काही घटकाकडून जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. परंतु बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत केलेलं संपूर्ण कार्य हे अखंडपणे मानव जातीसाठी होते हे अगदी सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. त्यामुळे बाबासाहेब हे सर्वांचे आहेत म्हणून त्यांना विश्वरत्न मानले जाते.
        
यावेळी भीम आर्मीचे शिरोळ तालुका अध्यक्ष,दिपक शेडबाळे यांनी आपले मत प्रतिपादन करताना डॉ.आंबेडकरांच्या एका विचारांची आठवण करून दिली त्यासाठी बाबासाहेबांनी दिलेले उदाहरण सांगितले. समाजातील तथाकथित व्यवस्थेने ब्राह्मण, क्षत्रिय,वैश्य व शूद्र अशा प्रकारे जातीची व मानवतेची उतरंड करून मानव जातीमध्ये भेदाभेद केला आहे. ही जातीची उतरंड इतकी वाईट आहे की जिना नसलेल्या चार मजली इमारती सारखी आहे. त्यामुळे चौथ्या मजल्यावर असणाऱ्या ब्राह्मण व्यक्तीला खाली येता येत नाही व तळात असणाऱ्या शूद्र व्यक्तीला जिना नसल्यामुळे वरच्या मजल्यावर जाता येत नाही म्हणजे ही व्यवस्था जाणीवपूर्वक करण्यात आली असून आपल्याला ही व्यवस्था मोडून काढायची आहे यासाठी शिक्षण व संघर्षाच्या माध्यमातून ही व्यवस्था मोडून काढता येते.यासाठी आपणही बाबासाहेबांच्या या विचारांचे स्मरण करून ही व्यवस्था बदलून टाकूया यासाठी आपण एकत्र येऊन बाबासाहेबांचे कार्य पूर्ण करूया.
      
दरवर्षीप्रमाणे महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशात हा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात येतो परंतु जयसिंगपूर शहरातील काही मोजक्या मंडळाच्यावतीने बाबासाहेबांना  अनोखी प्रकारची अभिवादनपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यापैकी अण्णाभाऊ साठे तरुण मित्र मंडळ नेहमी हिरीरीने बाबासाहेबांच्या आचार विचाराचा जागर करण्याचा प्रयत्न करते फक्त आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादनाची औपचारिकता पूर्ण केली जात नाही त्यासाठी कृतिशील कार्यक्रम राबवले जातात. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजन, जास्त वेळ वाचन स्पर्धा, उत्तम वक्त्यांच्या भाषणांचे आयोजन करणे, बाबासाहेबांची पुस्तके विविध ग्रंथालयाला भेट देणे, दलित समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे,संस्कार वर्गाचे आयोजन करणे, रक्तदान -नेत्रदान शिबिर,विद्रोही काव्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, महिलांची आरोग्य तपासणी ,भिम गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व विशिष्ट भागात जाऊन साफ सफाई करणे अशा प्रकारचे स्तुत्य व रचनात्मक उपक्रम या मंडळाच्या वतीने दरवर्षी केले जातात  मात्र कोरानाच्या पार्श्वभूमीवर हे उपक्रम राबविता आले नाहीत. परंतु भविष्यात करण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या  खर्चाची  आर्थिक  तजवीज मात्र त्यांच्याकडून करण्यात आली आहे.अशा प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करून एक प्रकारे सामाजिक संवेदनशीलता व सकल मानवतेबाबतची करुणा या मंडळाच्या वतीने दाखविली जाते.
    
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन अभिवादन कार्यक्रमावेळी अब्दुल बागवान, संदीप शिंदे,दादू आयगोळे,रवि आदुके, विशाल पुजारी,संदेश साठे,बंडू रजपूत, सुरेश आवळे,सौरभ तिवडे,पवन भंडारे व सुकुमार काळे हे सामाजिक कार्यकर्ते व भीम आर्मीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments