करमाळा/प्रतिनिधी:
करमाळा तालुक्यामध्ये गेल्या दहा दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी राज्य शासनाने वनाधिकाऱ्यांना शोध मोहिमेसाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी माडाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. जर वन विभागाला हेलिकॅप्टर उपलब्ध करून देण्यात राज्य शासनाला अडचणी असतील तर आमच्याकडून खाजगी हेलिकॅप्टर देण्याची परवानगी राज्य शासनाने द्यावी, अशीही मागणी निंबाळकर यांनी केली
करमाळा तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून गोदावरी खोऱ्यातून आलेल्या बिबट्याने तीन जणांचा बळी घेतला आहे. वनविभागाला बिबट्याला जेरबंद करण्यात अद्यापही अपयश आले आहे. करमाळा तालुक्यात पाहणी करण्यात आलेल्या खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ही मागणी केली.
माजी आमदार नारायण पाटील यांची ही मागणी
करमाळा तालुक्यात नरभक्षक बिबट्याने एका आठवड्यात तीन जणांचे बळी घेतले आहेत. बिबट्याला जेरबंद करता आले नाही किंवा त्याला ठार मारताही आले नाही. त्यामुळे दिवसेंदिवस बिबट्याविषयी लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून, शासनाने तत्काळ २० ड्रोन कॅमेरे व पाच शार्पशूटर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
(Advertise)
वनविभागाला बिबट्याला पकडण्यात अपयश
अहमदनगर, बीड येथे ८ जणांचा खात्मा करून करमाळा तालुक्यात शिरलेल्या बिबट्याने ३ जणांचा बळी घेतला. त्यानंतर या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश आले. बिबट्या ज्या उसात लपून बसला होता, तो पाच एकर उसाचा फडच जाळण्यात आला. आग लागल्यानंतर बिबट्या बाहेर आला. शार्पशूटरने गोळी मारली मात्र त्यातूनही बिबट्या निसटल्याने आता संपूर्ण करमाळा तालुकाच त्या नरभक्षक बिबट्याच्या दहशतीखाली आहे. दरम्यान, वनविभाग, पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थ या बिबट्याला पकडण्यासाठी रात्रंदिवस शोध घेत आहेत. मात्र, मंगळवारी सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. बिबट्याला पकडण्यासाठी अंजनडोह, चिखलठाण, शेटफळ आदी परिसरात सुमारे १५ पिंजरे, ४० कॅमेरे, डॉग स्कॉड, वन्यप्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी ५ हत्यारबंद पोलिसांसह ५ शार्पशूटरही तैनात करण्यात आले आहेत.
बिबट्या वावर असलेला परिसर हा ऊस, तूर, ज्वारी व इतर पिके असलेला आहे. हजार-हजार हेक्टरचे सलग क्षेत्र असल्याने यामध्ये त्याचा शोध घेणे अतिशय कठीण होत असल्याचेही वनविभागाने सांंगितले आहे. बिबट्याला पिंजराबंद करण्यास तसेच गरजेप्रमाणे तज्ज्ञांच्या उपस्थितीत बेशुद्ध करून बंदिस्त करण्याची परवानगी प्राप्त झाली आहे. तसे न झाल्यास त्याला ठार मारण्याचेही आदेश वनविभागाला मिळाले आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत तरी बिबट्याला जेरबंद अथवा ठार मारण्यात वनविभागाला यश आले नव्हते.
0 Comments