बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण (एम.आय.डी.सी.) बार्शीमध्ये कार्यान्वित होण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्धतेमध्ये येणारे सर्व अडथळे दूर करण्याबाबत पुढाकार घेऊन उद्योग निर्मिती व पर्यायाने रोजगार निर्मिती करण्यासाठी महाहौँसिगचे माजी सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी मुंबई येथे मंत्रालयात उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत चर्चा केली. यावेळी उद्योग खात्याचे उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीची माहिती देताना मिरगणे म्हणाले, बार्शीत एम.आय.डी.सी.ला मंजूरी मिळून व त्यासाठी लागणारी जमिन संपादनाची प्रक्रिया पुर्ण होऊन १५ वर्ष लोटले आहे. सध्या बार्शी येथे एम. आय.डी.सी.चे ऑनलाईन भूखंड वितरण सुरू आहे. तसेच एम. आय.डी.सी. मध्ये अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, सार्वजनिक विद्युत व्यवस्था आदी सुविधा विकसित होत आहेत. मात्र कोणत्याही उद्योगासाठी लागणारी मुलभूत गरज म्हणजे पाणी मात्र उपलब्ध झालेले नाही. एम.आय.डी.सी.ला औद्योगिक वापरासाठी लागणारे पाणी हे शहरासाठी उजनीवरून येणाच्या पाण्यातून उपलब्ध करून घेण्याची तरतूद त्या विकास आराखड्यामध्ये अंतर्तभूत होती. मात्र या पाण्यासाठी नगरपालिकेकडून आकारण्यात येणारे दर अवास्तव असल्याने हे पाणी शुल्क भरणे एम.आय.डी.सी. साठी अव्यवहार्य आहे. त्यामुळे एम.आय.डी.सी. आजतागायत हे पाणी उपलब्ध करून घेण्यास धजावलेली नाही. तसेच बार्शी लगतच्या उस्मानाबाद, भूम, टेभूण्णी येथील एम.आय.डी.सी. मध्ये ज्या दराने पाणी उपलब्ध करून घेतले गेले आहे त्या दरांपेक्षाही बार्शी नगरपालिकेचे दर हे जाचक व महागडे आहेत. त्यामुळे पाणी उपलब्ध होत नाही व एम.आय.डी.सी. सूरू होत नाही, अशा दृष्टचक्रात एम.आय.डी.सी.चा प्रश्न रेंगाळत पडला आहे.
एमआयडीसी मध्ये सध्या असलेल्या विहिरीचे पाणी हे ठराविक काळापुरते उपलब्ध होवू शकते. कारखानदारीला बारमाही पाण्याची गरज असते. त्यामुळे विंधनविहीरींच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून द्यावे. तसेच एम.आय.डी.सी. नजिकच्या तांबेवाडी (एम.आय.टेंक) या बृहत लघु प्रकल्पामधून पाणी उपलब्ध करून घ्यावे. त्याचबरोबर पाणी उपलब्धेबाबतचे सर्व पर्याय अजमावून पालकमंत्री, जिल्हाधिकारी व पालिकेच्या अधिकार्याबरोबरही याबाबत विचार विनिमय बैठक व्हावी, असे मी मंत्री महोद्यांना सुचवले. एम.आय.डी.सी. हि तालुक्याची काळाची गरज असून बेरोजगारी दुर करण्यासाठी एम.आय.डी.सी. च्या कार्यान्वीत होण्याबाबतची नितांत गरज मांडल्यानंतर श्रीमती तटकरे यांनी मांडलेल्या सर्व मुद्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. याबाबत पालकमंत्री, जिल्हाधिकारी, एम.आय.डी.सी.शी संबंधित सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांची उच्च स्तरीय बैठक लवकरच बोलवू असेही अभिवचन त्यांनी दिले. तसेच पाणी उपलब्धतेबाबत सर्व स्त्रोत व त्यांची व्यवहार्यता याबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश श्रीमती तटकरे यांनी उद्योग खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
0 Comments