खुल्या मैदानात भरणार शाळा – शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड


 

२३ नोव्हेंबरपासून नववी आणि बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. चाळीस मिनिटांचे चार तासच भरणारी ही शाळा खुल्या मैदानात, मोकळ्या जागेत तसेच खेळत्या हवेच्या वर्गात घेण्याची मुभा शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापनास दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोरोनामुळे मोकळ्या वातावरणात शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. ऑनलाईन शिक्षणात शिकवलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी, शंका समाधान व नवा विषय प्रत्यक्ष वर्गात शिकवला जाईल.

महाराष्ट्र राज्य भौगोलिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळा आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव ही जिल्हाजिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात आहे. अशा वेळी शिक्षण चालू करणे आव्हानात्मक असले तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य व शिक्षण याला विचारात घेऊनच शिक्षण विभागाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करूनच अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू होणार आहे. चाळीस मिनिटांची चार तासच शाळा होणार आहे. शाळेला मैदान किंवा मोकळी जागा असल्यास हे वर्ग खुल्या मैदानावर, मोकळ्या जागेत तसेच खेळत्या हवेच्या वर्गात घेण्याचीही मुभा शाळा व्यवस्थापनास दिली आहे. स्थानिक प्रशासन, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, व्यवस्थापक व सरकार यांच्या सामुदायिक जबाबदारीवर एक दिवसआड करून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

शाळा भरवताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याची सूचनाही शिक्षण विभागाने यापूर्वीच जाहीर केल्या आहेत. या सूचनांचे पालन होते आहे की नाही याची तपासणी संबंधित अधिकारी करणार आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी जिल्हा प्रशासन व महापालिकेद्वारे शिक्षकांची आरोग्य तपासणी होणार आहे. शिक्षकांनी शिकवताना व विद्यार्थ्यानी शिंकताना मास्क घालने बंधनकारक आहे. आरोग्य विषयक सर्व नियमांचे पालन शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी वर्गाने केले पाहिजे.

प्रत्यक्ष शिक्षकांद्वारे संवाद व सवंगड्यासोबत शिक्षण अनुभव व ज्ञानार्जन करण्यासाठी शाळा सुरू होत आहेत असे करताना विद्यार्थ्यांची काळजी घेणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. कुटुंबातील सदस्य आजारी असलेल्या विद्यार्थ्यांनी व स्वतःचे स्वास्थ्य चांगले नसल्यास खबरदारीचा उपाय म्हणून अशा विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये अशा सुचना ही दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments