राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन?, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह तीन मंत्र्यांनी दिले संकेत


राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुन्हा एकदा लॉकडाऊन लावायचा की शिथील केलेले निर्बंध कडक करून नव्याने लागू करायचे याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत असून पुढील दहा-बारा दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन विचाराअंती निर्णय घेण्यात येईल, असे म्हटले आहे. 
(Advertise)

तर दिवाळीनंतर लोकांची बेफिकीर वृत्ती वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत दोन दिवसांत बैठक घेऊन कडक निर्बंध लागू करण्याची घोषणा केली जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही निर्बंध लावण्यात येणार असल्याचे सांगितल्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत राज्यात कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी पुन्हा निर्बंध लागू होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(Advertise)

रविवारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जायचे आहे काय? असा सवाल करत विनामास्क फिरणाऱ्या आणि बेफिकिरीने गर्दी करणाऱ्या नागरिकांविषयी नाराजी व्यक्त केली होती. पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जायचे नसेल तर स्वयंशिस्त पाळा. मास्क वापरा, वारंवार हात धुवा, अनावश्यक ठिकाणी जाणे टाळा आणि शारीरिक अंतर राखा असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार, टोपे, वडेट्टीवार यांची वक्तव्ये आली आहेत.
(Advertise)

जालन्यात बोलताना आरोग्यमंत्री टोपे यांनी शिथील केलेले निर्बंध पुन्हा लागू करण्याबाबत दोन दिवसांत घोषणा होईल, असे सांगितले आहे. शारीरिक अंतर पाळले जात नसल्यामुळे कठोर निर्णय घ्यावाच लागणार आहे. 
(Advertise)

गेल्या काही दिवसांपासून बिनधास्तपणे वावरण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. ही स्थिती कोरोना वाढीस लागण्यास कारणीभूत ठरणारी आहे. त्यासाठी निर्बंध लावावेच लागतील, असे टोपे म्हणाले. दिल्लीच्या धर्तीवर राज्यातही मास्क न वापरणाऱ्यांना जास्तीचा दंड आकारला जाईल, असेही टोपे म्हणाले. लग्न समारंभातील उपस्थितांची संख्या २०० वरून पुन्हा ५० वर आणली जाण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय- अजित पवारः टोपे पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लॉकडाऊनबाबत भाष्य केले. येत्या दहा-बारा दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल. दिवाळीच्या काळात सर्वजण आनंदात होते. त्यामुळे कोरोनाकडे थोडेफार दुर्लक्ष झाले. परंतु आता दिवाळी संपली आहे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. पुणे जिल्ह्यासह राज्यातील इतर भागातील परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊन लागू करायचा की नाही, याबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल, असे पवार म्हणाले.
(Advertise)

आढावा घेण्याचे काम सुरु- वडेट्टीवारः मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही जीव वाचवणे महत्वाचे असल्याचे सांगत पुन्हा निर्बंध लागू केले जातील, असे म्हटले आहे. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम सुरु आहे. आठ दिवसांत अंदाज घेऊन काही निर्बंध आणता येतील का, याचा विचार सुरु आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचे आकडे वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. क्वारंटाइनबाबतही कडक निर्बंध आणावे लागतील, असे वडेट्टीवार म्हणाले.
(Advertise)

…तर लॉकडाऊनची गरज पडणार नाही- मलिकः महाराष्ट्रात सर्व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेतली आणि सगळे नियम पाळले तर पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची गरज भासणार नाही, असे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे. देशाच्या अनेक भागात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. महाराष्ट्रात अद्याप तरी दुसरी लाट आलेली नाही. ही दुसरी लाट टाळायची असेल तर सगळ्यांनी काटेकोरपणे नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे मलिक म्हणाले.

Post a Comment

0 Comments