कट्टर शिवसेना नेत्याची गळफास घेऊन आत्महत्या


नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पंचायत समितीचे माजी सभापती अरुण मुसळे  यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कट्टर शिवसैनिक म्हणून अरुण मुसळे यांची ओळख होती. त्यांच्या आत्महत्येमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अरुण मुसळे (वय ५३) यांनी सोमवारी दुपारी नांदूरवैद्य येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी वाडिवर्‍हे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. संपूर्ण भात शेती अवकाळी पावसामुळे पाण्यात वाहून गेली. भात शेतीचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे अरुण मुसळे आर्थिक विवंचनेत होते. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अरुण मुसळे यांनी नांदूरवैद्य गावच्या ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून कामाला होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांनी तालुका पिंजून काढला. अनेक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर  पहिल्यांदाच १९९७-९८ पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्क्याने ते साकूरमधून निवडून आले होते. शिवसेनेची एकहाती सत्ता आल्यामुळे अरुण मुसळे यांची इगतपुरी पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर सलग पाच वर्ष नांदूरवैद्य ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून ते राहिले होते. अरुण मुसळे यांच्या आत्महत्येमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments