विठू नगरी कार्तिकी एकादशी दिवशी निरव शांतता, पंढरी व चंद्रभागा भक्तांविना सुनीसुनी


पंढरपूर/प्रतिनिधी:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढीनंतर कार्तिकी यात्रा देखील वारकऱ्यांच्या अनुपस्थितीत होत आहे. दरवर्षी यात्राकाळात हरिनामाचा जयघोष अन्‌ टाळ - मृदंगाच्या आवाजाने दुमदुमून जाणाऱ्या पंढरीत गुरुवारी कार्तिकी एकादशी दिवशी निरव शांतता होती. नागरिकांना संचारबंदीच्या सक्त सुचना देण्यात आल्याने नागरिक घराबाहेर पडताना दिसत नाहीत. एकंदरीत ऐन कार्तिकी एकादशीला पंढरी व चंद्रभागा वाळवट मात्र भक्तांविना सुनीसुनी वाटत आहे.
(Advertise)

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पाडली. विठ्ठलाच्या शासकीय महापूजेच्या मानाच्या वारकरी दाम्पत्याचा मान कवडुजी नारायण भोयर व कुसुमबाई कवडूजी भोयर यांना मिळाला. उपमुख्यमंत्र्यांसमेवत या दाम्पत्यानेही श्री विठ्ठलाची महापूजा केली.

(Advertise)

ना जयघोष ना गजर..!
यात्राकाळात पंढरपुरातील सर्व मठ, धर्मशाळा आणि चंद्रभागेच्या वाळवंटात सर्वत्र वारकरी हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ - मृदंगाच्या गजरात तल्लीन होत असतात. अवघी पंढरी दुमदुमून जात असते. परंतु वारकरी येऊ शकलेले नसल्याने दरवर्षी दशमी दिवशी टिपेला जाणारा जयघोष झाला नाही आणि टाळ - मृदंगाचा गजरही ऐकू आला नाही.  कार्तिकी एकादशीच्या  पहाटे काही मोजक्याच दिंड्या पालख्यांचे प्रदक्षिणा मार्गावर प्रदक्षणा घालण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यामुळे प्रदक्षिणा मार्गावर हरिनामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाचा आवाज घुमताना दिसत होता. वारकरी भक्त चौफाळा आणि महाद्वारातून विठ्ठलाला नमन करत अभंग आणि कीर्तन प्रदक्षिणा पूर्ण केली, मात्र त्यानंतर प्रदक्षणा रोडवर निर्मनुष्य असल्याचे चित्र पाहायला मिळाले
(Advertise)

सुनी सुनी चंद्रभागा भक्त विना

आषाढी वारी नंतर कार्तिकी वारी रद्द करण्यात आली. २१ नोव्हेंबर ते एक डिसेंबर रोजी पर्यंत चंद्रभागा नदीपात्रात स्नानास बंदी घालण्यात आली आहे. कार्तिकी वारी म्हणलं की लाखोच्या संख्येने वारकरी भक्त पंढरीत दाखल होतात, चंद्रभागा स्नान करतात विठू माऊलीचा जयघोष करत नामदेव पायरी तसेच विठ्ठलाचे व रुक्मिणी मातेचे दर्शन घेतात, मात्र कोरोना महामारी चा संसर्ग असल्यामुळे चंद्रभागा भक्तांना कार्तिकी एकादशीच्या दिवशी सुनी सुनी आणि ओसाड पडले चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे चंद्रभागा घाटांवर व वाळवंटात तसेच चंद्रभागा पात्राच्या दोन्ही बाजूस पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रभागा वाळवंटात एकप्रकारे निरव शांतता दिसून येते.
(Advertise)

पंढरी कडक पोलीस बंदोबस्त

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने दोन दिवस संचारबंदी आदेश लागू करत पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेला भाविक येणार नाहीत, याची दक्षता घेतली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा पोलिस प्रशासनाच्यावतीने त्रिस्तरीय नाकाबंदी करण्यात आली आहे. पंढरपूर शहराबाहेर देखील कडक नाकाबंदी लावण्यात आली असल्याने शहरात येणार्‍यांची संख्या कमी झाली आहे. तर आडमार्गाने शहरात दाखल होणार्‍यांना शहरात येताच ठिकठिकाणी उभारलेल्या नाकाबंदीत रोखण्यात येत आहे. यात पोलिस अधिक्षक, अप्पर पोलिस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी ११, पोलिस निरीक्षक-सपोनि १३०, पोलिस कर्मचारी ११००, वाहतूक पोलिस १००, दंगाकाबू पथक, एसआरपीएफ पथक, होमगार्ड ५०० असे १८०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
(Advertise)

पंढरीतील मुख्य बाजार पेठ बंद

शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना संचार करता येत नाही. पंढरपुरातील मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. प्रदक्षणा रोड, महाद्वार, पश्चिम, उत्तर द्वार, छत्रपती शिवाजी चौक येथील व्यापाऱ्यांनी दुकान बंद ठेव प्रशासनाला सहकार्य केले आहे त्यामुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. शहरातील व आजूबाजूच्या १०गावांतील व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.  शहरातील व परिसरातील मठ, मंदिरे, संस्थाने यांना नोटीसा बजावून भाविकांना आश्रय न देण्याच्या सुचना या अगोदरच देण्यात आल्या आहेत. तर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे जाणारे सर्व मार्ग, गल्ली बोळे बॅरेकेडिंग करुन बंद करण्यात आले आहेत. मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, भक्तीमार्ग आदी परिसरात जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments