पंढरपूर/प्रतिनिधी:
पंढरपूर तालुक्यातील सोनके येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईमध्ये १ लाख २३ हजार ४५० रुपये किमतीची ५३०० लिटर दारू जप्त केली आहे. पंढरपूर पोलिस उपअधीक्षक विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली
(Advertise)
सोनके भागात संशयित आरोपी दिलीप कृष्णा गायकवाड आणि मोहन अनिल दिघे हे अवैधरित्या हातभट्टी दारूची विक्री करत असलेले माहिती पंढरपूर तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार बुधवारी (ता. ११) रात्री सोनके तलावाजवळ दिलीप गायकवाड यांच्या उसाच्या शेतात विजेच्या खांबावरून चोरून वीज घेऊन हातभट्टी तयार करण्यात येत होती. या ठिकाणी गूळ मिश्रित व इतर घातक रसायने मिसळून हातभट्टी दारू तयार करण्याचे काम सुरू होते.
(Advertise)
आरोपी दिलीप कृष्णा गायकवाड आणि मोहन अनिल दिघे (रा. सोनके, ता. पंढरपूर) हे पळून गेले. कारवाई दरम्यान पोलिसांनी हातभट्टी उद्ध्वस्त करून सर्व साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी संशयित आरोपी गायकवाड आणि दिघे यांच्या विरोधात पोलिसांनी पहिल्यांदाच भादंवि ३२८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
कारवाईमध्ये पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे, उपनिरीक्षक मैनुद्दीन खान, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कांबळे, पोलिस हेड कॉन्स्टेबल आनंता शिंदे, पोलिस नाईक मोहसीन सय्यद, रसीद मुलाणी, अंकुश नलवडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
0 Comments