आम्हाला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हवीये



मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी केलेल्या वक्तव्यावरून संतप्त प्रतिक्रियेला सामोरं जावं लागलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका करताना महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. कंगनानं यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. ज्यातून तिने राज्य सरकारचा उल्लेख फॅसिस्ट सरकार असा केला आहे.
आधी सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई पोलिसांविषयी वादग्रस्त ट्विट केलं होतं. या ट्विटनंतर तिच्यावर टीका झाली. यात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही कंगनाला सुनावलं होतं. त्यानंतर तिने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मिरशी केली होती.

सध्या कंगना हिमाचल प्रदेशातील तिच्या घरी असून, अजूनही हा वाद शमल्याचं दिसत नाही. कंगनानं आणखी एक ट्विट करत महाराष्ट्र सरकारला लक्ष्य केलं आहे. “करोना महामारीमुळे महाराष्ट्रातील गंभीर परिस्थिती अजूनही कायम आहे. रुग्णसंख्या वेगानं वाढत आहे, पण फॅसिस्ट सरकार त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना त्रास देण्यात व्यस्त आहे. आम्हाला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हवी आहे. फॅसिझम थांबवा,” असं ट्विट करत कंगणानं राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.




 

Post a Comment

0 Comments