संघर्षावर मात करत मिळवली 'डॉक्टरेट': शिरनांदगीच्या परमेश्वर थोरबोले यांचा प्रेरणादायी प्रवास....


घरची परिस्थिती अतिशय हलाखीची, सततचे दारिद्र्य, ना कुटुंबात कोणी शिक्षित, ना कोणाचे  मार्गदर्शन अशी पार्श्वभूमी असताना सुद्धा, पण जबरदस्त इच्छाशक्ती  ठेवून, कुटुंबाला आनंदाचे दिवस आणावयाचे स्वप्न पाहणारा शिरनांदगीचा तरुण परमेश्वर थोरबोले यांचा शैक्षणिक प्रवास हा संघर्षमय असला तरी तो एक प्रेरणादायी आहे. 
  
मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी गावातील परमेश्वर थोरबोले या युवकाने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे इंग्रजी विषयातून नुकतीच डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आणि कुटुंबातील सदस्यांचा आनंद गगनात मावेना.
दारिद्र्य काय असते आणि त्याचे चटके लहानपणापासून सहन करत आलेला परमेश्वर हा सामान्य शेतकरी कुटुंबातील असला तरी त्याला कोणतीच शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. भैरवनाथ विद्यालय शिरनांदगी येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. तसेच श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा येथे उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. बारावीला त्यांना इंग्रजी विषयांमध्ये पस्तीस मार्क मिळाले. त्यामुळे येथून पुढील  शैक्षणिक प्रवास खूप खडतर होता. पण ते खचून गेले नाहीत. पुढे त्यांनी पदवीचे शिक्षण श्री संत दामाजी महाविद्यालय येथून पूर्ण केले. पण बारावीला त्यांना इंग्रजीमध्ये पस्तीस मार्क होते ही सल मनामध्ये बोचत असल्यामुळे, त्यांनी खूप जिद्दीने व मेहनतीने, कष्टामध्ये सातत्य ठेवून त्यांनी बीए पदवी परीक्षेत स्पेशल इंग्रजी विषयांमध्ये  श्री संत दामाजी महाविद्यालयांमध्ये  प्रथम क्रमांक मिळवला.  हे यश  त्यांनी स्व प्रेरणेतून  व स्वतःच्या अस्तित्वाशी झगडा करत मिळवले. बसचा पास काढण्यासाठी आवश्यक असणारे पैसे देखील नसायचे तरीदेखील शिक्षण घेण्याची जिद्द आणि येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करत त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पण पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांना कोल्हापूरला जावे लागणार होते. कोल्हापूर हे शहर त्यांच्यासाठी नविनच होते. 
आयुष्यात प्रथमच घरापासून एवढ्या दूर अंतरावर जाण्याचा योग येत होता. त्यामुळे एवढ्या मोठ्या शहरात राहणारे हे आपल्याला परवडणारे नव्हते याची त्यांना जाणीव झाली होती. पण शिक्षण घेणे गरजेचे होते, त्यातूनच वाट शोधत त्यांनी कोल्हापूरला धाव घेतली आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील इंग्रजी विभागातून त्यांनी एम ए चे शिक्षण पूर्ण केले. या विद्यापीठाने आजपर्यंत अनेक लोक घडवले आहेत, त्यामुळे आपण कुठे वाया जाणार नाही याची निश्चिती त्यांच्या मनाला होती. एम ए पासूनच शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये राहत होते. दरम्यानच्या काळात मी नुकताच शिवाजी विद्यापीठात एम. ए साठी समाजशास्त्र विभागात प्रवेश घेतला होता. वस्तीगृहातील मेस मध्ये आमची भेट होयची त्यातूनच चांगली ओळख झाली. माझे एम .ए पूर्ण झाल्यानंतर मी एम फील  साठी प्रवेश घेतला आणि आम्ही दोघे वसतिगृहात  एकाच खोलीत रहायला आलो. शांत, संयमी, तत्वांशी एकनिष्ठ ,असणारा असा परमेश्वर चाकोरी सोडून कधीही वागला नाही. याशिवाय त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे अफाट इच्छाशक्ती व शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणे हे त्यांचे उत्तम गुण आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा अंगभूत असणारा गुण त्याला मला अधोरेखित करावेसे वाटते तो म्हणजे स्वयंशिस्त.
सकाळी लवकर उठणे आणि संध्याकाळी लवकर झोपणे हा त्यांचा दिनक्रम असायचा. परिस्थितीची जाण ठेवून  स्वतःचे जीवन जगत होता. मौज-मस्ती, टाईमपास, चैन हे शब्द त्यांच्या शब्दकोशामध्येच नव्हते. वसतिगृहातील दिवस हे  आपण आयुष्यभर आठवणीत ठेवण्यासारखे असतात,  पण प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. 

कोल्हापूर मध्ये राहून देखील कुटुंबाची सतत काळजी करत असत, पण अभ्यासात कधी खंड पडू दिला नाही. आई-वडिलांचे असणारे सतत आजारपण तसेच दोन लहान भाऊ आणि दुष्काळाशी सामना करत असलेली शेती याचा विचार सतत मनामध्ये करायचा. एका बाजूला परस्थिती व दुसर्‍या बाजूला जबाबदारी यांच्यामधून मार्ग काढून शिक्षण पूर्ण करायचे होते. सध्याच्या आधुनिक जमान्यामध्ये सुद्धा, त्यांचे साधे राहणीमान, साधा मोबाईल, अवघे दोन ते तीन ड्रेस यामध्येच त्यांनी दिवस काढले. पण शिक्षणासाठी कधी मनाचा मागसलेपणा दाखवला नाही. अनेक स्वप्न मनाशी बाळगून विद्यापीठात जीवन जगत होता. मोबाईलला रिचार्ज साठी पैसे 4कुठून आणायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर असायचा म्हणून मोबाईल कमी वापरायचा. तो मला कायम म्हणायचं,  विकास "आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जन्माला यावे हे आपल्या हातात नाही,  पण त्या परिस्थितीमध्ये आपण कसं वागावं हे निश्चित आपल्या हातामध्ये आहे.मला आजही एक घटना आठवते, परमेश्वर पीएच. डी च काम आवरून गावी गेला होता कारण काहीच काम नसताना कोल्हापूर मध्ये उगाच राहणे हे त्याला परवडणारे नव्हतं म्हणून तो गावी गेला,पण विद्यापीठ मध्ये त्याचे काही काम निघाले तर तो  कोल्हापूर ला यायचा त्यावेळी येताना सोबत घरातूनच 2 दिवस पुरेल एवढ्या भाकरी आणि शेंगदाणे ची चटणी घेऊन यायचा आणि त्यावर च दोन दिवस काढायचा त्याने कधीच कोणासमोर हात पसरले नाहीत.ना कधी स्वतःच्या परस्थिची व्यथा कोणा जवळ मांडली. जीवनातले सगळे दुःख मनात ठेवत होता आणि आनंद सर्वांना दाखवत होता.

" परिस्थितीने गंजलेला पण स्वप्नांवर प्रेम करत असणारा कायम मनामध्ये अभ्यासाचाच विचार ठेवणारा  असा परमेश्वर पीएच डी चा अभ्यास करत असताना सेट परीक्षा देखील पास झाला. आपण सेट परीक्षा पास झाल्याचा आनंद गगनात मावत नव्हता पण मित्रांना पेढे देण्याइतपत पैसे देखील त्यांच्याकडे नसायचे. इतकी गरिबी असणारा परमेश्वर स्वप्न उराशी बाळगून होता. अगदी गेल्या वर्षीपर्यंत परमेश्वर त्यांच्या कुटुंबासह झोपडीवजा घरात राहत होता. वडिलांचे घर बांधण्याचे स्वप्न परमेश्वर व त्यांच्या भावांनी मनावर घेतले व गरजेपुरते त्यांनी घर बांधले पण दरम्यान वडिलांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. आणि सर्वकाही अर्ध्यावरती पडले. वडिलांच्या अचानक जाण्याने परमेश्वर पूर्णतः खचून गेला. पण वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन्ही भावांना धीर देत तो  पुन्हा उभा राहिला. परमेश्वर यांच्या संघर्षमय जीवन प्रवासाचा मी स्वतः एक डोळ्याने पाहिलेला व अनुभवलेला साक्षीदार आहे. परमेश्वरचा हा प्रवास  अनेक तरुणांना प्रेरणादायी ठरू शकतो. त्यांना पीएच् डी साठी डॉ. प्रभंजन माने यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तसेच त्यांना या शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवासामध्ये  डॉ. ए. एम. सरवदे यांचे सहकार्य मिळाले  व डॉ. जी. बी. कोळेकर यांचा पाठिंबा मिळाला. संघर्षमय जीवनातून परमेश्वरने शिक्षण पूर्ण केले. आज डॉक्टरेट पदवी प्राप्त केल्याने परमेश्वर यांचे मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा...!

लेखक- विकास मस्के
वासुंबे, ता.तासगाव जि. सांगली
(लेखक हे परमेश्वर थोरबोले यांचे शिवाजी विद्यापीठ वसतिगृहातील रूम मधील सहकारी होते)

Post a Comment

0 Comments