नवी दिल्ली : मराठा आरक्षणासंबंधी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. मराठा समाजातील नेते आणि बांधवांकडे साखर कारखाने आहेत, समाजाने महाराष्ट्राला १० हून अधिक मुख्यमंत्री दिले आहेत, असा युक्तिवाद सुनावणीदरम्यान याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून करण्यात आला. मराठा आरक्षणाचे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. येत्या, १ सप्टेंबरला पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे.
शुक्रवारी पी. एस. पटवालिया, अभिषेक मनू सिंघवी यांनी राज्य सरकारची बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने विरोधकांची बाजू ऐकून घेतली. याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
राज्य सरकारकडून मागासवर्ग आधारावर मराठा समाजाला आरक्षण कसे देण्यात आले? असा सवाल सदावर्ते यांनी उपस्थित केला. मराठा समाजाचे राज्यात १०पेक्षा जास्त मुख्यमंत्री झाले. अनेक मराठा समाजाच्या नेत्यांचा आणि लोकांचे साखर कारखाने आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देणे चुकीचे आहे, अशी भूमिका सदावर्ते यांनी खंडपीठासमक्ष मांडली. या आरक्षणाचा फायदा मराठा समाजातील बड्या राजकीय नेत्यांना व्हावा केवळ ह्याच हेतूसाठी मराठा समाजाला आरक्षण दिले आहे असा पुनरुच्चार आहे सदावर्ते यांनी केला.
राज्य सरकारसह अनेक याचिकाकर्त्यांनी मराठा आरक्षणाची सुनावणी ईडब्ल्यूएसच्या सुनावणीसोबत पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करावी, अशी विनंती केली आहे. दरम्यान, सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टाने याबाबतची पुढील सुनावणी येत्या मंगळवारी १ सप्टेंबर रोजी होईल, असे स्पष्ट केले.
0 Comments