राष्ट्रवादीकडून एका दगडात अनेक पक्षी मारण्यासाठी प्रयत्न
पंढरपूर / सोलापूर :
डॉ. धवलसिंहांना विधानपरिषदेवर संधी देवून एका दगडात अनेक पक्षी मारण्यासाठी राष्ट्रवादीकडून तसे प्रयत्न सुरु आहेत. मोहिते पाटील यांना संधी दिली तर सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला आणखी बळ मिळेल, असा आशावाद ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बळावला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षाबरोबर सोबत असलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते व त्यांचे पुत्र आमदार रणजितसिंह यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपात प्रवेश केला. तेव्हापासून जिल्ह्यात राष्ट्रवादीकडे पक्ष नेतृत्वाची उणीव आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही राष्ट्रवादीला माळशिरस तालुक्यात फटका बसला. विधानसभेनंतर सावध झालेल्या राष्ट्रवादीने आता पक्ष वाढीसाठी पावले टाकण्यास सुरवात केली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. सत्तेच्या जोरावर राज्यात व विशेषतः सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी अधिक भक्कम करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने तसे जोरदार प्रयत्नही सुरु आहेत. पक्षाला अधिक उभारी देणाऱ्या आणि पक्ष संघटन वाढीसाठी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहे. यामध्ये अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.
सध्या डॉ. धवलसिंह हे विजयसिंह व रणजितसिंह यांच्यापासून दूर आहेत. विधानसभा निवडणुकीत डॉ. धवलसिहांनी राष्ट्रवादीला मदत केली होती. त्यानंतर आता धवलसिंहांच्या रुपयाने जिल्ह्यात युवा चेहरा देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरु असल्याची खात्रीशीर माहिती आहे.
डॉ. धवलसिंहांना राष्ट्रवादीने राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी दिली तर जनसेवेचे जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांबरोबरच माजी मंत्री (कै.) प्रतापसिंह मोहिते पाटील यांना मानणारे अनेक जुने कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादीत सक्रीय होतील, अशी आशाही राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. भाजपात गेलेले माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील व आमदार रणजितसिहांना राजकीय शह देण्यासाठी मोहिते पाटील घराण्यातीलच डॉ. धवलसिंहांना राष्ट्रवादीकडून आमदारकीचे बक्षीस दिले जाईल, अशी शक्यता राजकीय जाणकारांमधून वर्तवली जात आहे.
0 Comments