कोरोनाबाधित रुग्णांवर गावातच उपचाराचा वडणगे पॅटर्न

एकीकडे कोरोना रुग्णांवर उपचारासाठी दवाखान्यातील बेड अपुरे पडत आहेत तर दुसरीकडे या समस्येवर मात करण्यासाठी काही गावांनी पुढाकार घेतला आहे. यात आघाडीवर गाव आहे ते म्हणजे वडणगे.वडणगेचे सरपंच सचिन चौगुले यांच्या प्रगल्भ विचारातून आणि गावचे सुपुत्र प्राचार्य डॉ. महादेव नरके आणि डॉ. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनातून पुढे आलेल्या गावातच सौम्य लक्षणे असणाऱ्या  किंवा लक्षणे  नसणाऱ्या कोरोना रूग्णांवर उपचार करण्याचे निश्चित केले आहे. या संकल्पनेला पालकमंत्र्यांसह प्रशासनाने तातडीने मंजुरी दिली. एवढेच नाही तर या संकल्पनेवर आधारीत उपाययोजना संपुर्ण जिल्हयात राबविण्याचा निर्णय घेतला. हा आदर्श उपक्रम काही दिवसातच राज्यातही राबविला जाऊ शकतो. अर्थात उपसरपंच सतीश पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कोरोना दक्षता समिती, सर्व विभागांचे कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच हा धाडशी निर्णय घेतल्याचे सरपंच सचिन चौगले यांनी सांगितले.

                                                
       सध्या जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना बेड मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. प्रशासनालाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत नेहमीच एक पाऊल पुढचा विचार करणाऱ्या वडणगे (ता. करवीर) येथील प्रशासनाने लोकनियुक्त सरपंच सचिन चौगले यांच्या नेतत्वाखाली जिल्हा प्रशासनाचा भार हलका करण्यासाठी काही करता येईल का ? याबाबत व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे काही तज्ञांशी चर्चा केली. यामध्ये प्राचार्य डॉ. महादेव नरके, डॉ. संदीप पाटील यांच्यासह गावातील १३ डॉक्टरांशी चर्चा केली. सर्वांनीच गावच्या हितासाठी आणि गावकऱ्यांसाठी प्रशासनाच्या अशा निर्णयास सहकार्य करण्यास तत्काळ होकार दिला. या कॉन्फरन्सिंगद्वारे गावातच उपचार ही पद्धती पुढे आली. त्यानंतर कोरोना दक्षता समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करून या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. 
  यानंतर लगेचच जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे परवानगीसाठी पत्रव्यवहार केला.
      गावातील सौम्य लक्षणे असणाऱ्या अथवा लक्षणे नाहीत पण रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत, अशा कोरोनाबाधीत रुग्णांना घरीच अथवा अलगिकरण कक्षात अलगिकरण करून स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने उपचार करण्यात येणार असल्याने शहरातील रुग्णालयांवरील ताण कमी होईल. रूग्णांनाही सुलभ व वेळेत  उपचार मिळतील, आपल्या घरी अथवा गावात आहोत असा मानसिक आधारही मिळेल, हा या संकल्पने मागचा उद्देश आहे. असा नाविन्यपूर्ण आणि काळाची गरज असणारा वडणगे ग्रामपंचायतीने मांडलेला विषय पालकमंत्री सतेज पाटील यांनी उचलून धरला आणि  जिल्हा प्रशासनाने तातडीने या मागणीला होकार दिलाच, शिवाय जिल्हयात सर्वत्र हा उपक्रम राबविण्याचे नियोजन करून तसे आदेशही काढले. यामध्ये रुग्ण, घरचे लोक, डॉक्टर, ग्रामसमिती यांची जबाबदारी निश्चित करणारी आदर्श नियमावली जाहीर केली आहे.                                                                          या योजनेंतर्गत बाधीत रुग्णास शासन काही गोष्टी देणार आहेच. पण त्यापुढे जाऊन  ग्रामपंचायतीच्या १४ वा वित्त आयोग योजनेतून व ग्रामपंचायत फंडातून पल्स ऑक्सिमिटर, थर्मामीटर, वाफेचे यंत्र, आवश्यक औषधे, आवश्यक डायट खाद्य पुरवले जाईल. बाधीत रुग्णासाठी गावातील एक खाजगी डॉक्टर यांच्याकडे व्हिडिओ कॉल अथवा फोनद्वारे संपर्क करण्याची जबाबदारी देण्यात येईल. शिवाय समन्वयासाठी एक स्वयंसेवक नियुक्त करण्यात येईल. याला जिल्हा प्रशासनासह सर्वच घटकांची मदत मिळेल. 
     
 

Post a Comment

0 Comments