सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधचा सूर आळवला जात असला, तरी प्रत्यक्ष राजकीय हालचाली पाहता निवडणूक रंगण्याची चिन्हे स्पष्ट होऊ लागली आहेत. उमेदवारी अर्ज माघारीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक घेत निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली. त्यामुळे डीसीसी बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता मावळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील बोराटवाडी येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी शनिवारी दुपारी १२ ते ४ या वेळेत ही बैठक पार पडली. या बैठकीला आमदार सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, बाबासाहेब देशमुख, माजी आमदार राजन पाटील, जयवंतराव जगताप, संजयमामा शिंदे, दिलीप माने, दीपक साळुंखे, बबनराव आवताडे, रणजित शिंदे, दिग्विजय बागल यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.
जिल्हा बँकेच्या १९ जागांपैकी ११ जागा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या मतदारसंघातून निवडल्या जातात, तर उर्वरित आठ जागा पणन, दुग्ध संस्था, नागरी बँका, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, भटक्या विमुक्त प्रवर्ग आणि महिला प्रतिनिधी मतदारसंघातून निवडल्या जातात. या जागांच्या वाटपावरूनही नेत्यांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, भाजपचे आमदार सुभाष देशमुख, समाधान आवताडे आणि माजी आमदार राम सातपुते हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसरीकडे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भूमिकेकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
एकीकडे बिनविरोध निवडणुकीची चर्चा, तर दुसरीकडे पॅनल बांधणीसाठी सुरू असलेल्या बैठका आणि नेत्यांच्या स्वतंत्र हालचाली यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीतून नेत्यांनी एकमेकांची ताकद आणि राजकीय भूमिका तपासल्याचे मानले जात आहे. आता न्यायालयाचा निर्णय आणि उमेदवारी माघारीच्या दोन दिवसांत कोण माघार घेणार आणि कोण मैदानात ठाम राहणार, यावरच डीसीसी बँकेच्या निवडणुकीचे पुढील चित्र अवलंबून असेल.
0 Comments