धाराशिवच्या अनुदानित अध्यापक विद्यालयावर २५ लाखांच्या घोटाळ्याचा आरोप


धाराशिव : येथील श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित अनुदानित अध्यापक विद्यालय, धाराशिव येथे विद्यार्थ्यांकडून शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा जादा फी वसूल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सन २०१८-१९ पासून आजपर्यंत सुमारे २५ लाख रुपयांची अतिरिक्त वसुली झाल्याचा दावा करत संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, डी.एल.एड. अध्यापक विद्यालयातील प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून शासन निर्णयानुसार वार्षिक ट्युशन फी ३ हजार ३०० रुपये निश्चित असताना प्रत्यक्षात ६ हजार ५०० रुपये आकारण्यात आले. प्रति विद्यार्थी ३ हजार २०० रुपये अतिरिक्त घेतल्याने दरवर्षी सुमारे १०० विद्यार्थ्यांकडून गेल्या आठ वर्षांत जवळपास २५ लाख रुपयांची जादा वसुली झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

रोख स्वरूपात फी घेतल्याचा आरोप

विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त रक्कम रोख स्वरूपात घेण्यात आली असून त्याची अधिकृत पावती देण्यात आली नसल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. अनुदानित संस्थेने शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांची तसेच शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फौजदारी कारवाईची मागणी

या प्रकरणी अध्यापक विद्यालयाची मान्यता व अनुदान तात्काळ बंद करण्यात यावे, तसेच प्रभारी प्राचार्य श्री. पवार दत्तात्रय हरीभाऊ यांच्यावर फसवणूक व कटकारस्थानाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच २०१८-१९ पासून विद्यार्थ्यांकडून जादा वसूल केलेली रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश द्यावेत. या संपूर्ण प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) किंवा आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

संबंधित विभागांकडे निवेदन

या प्रकरणी शिक्षण आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी धाराशिव, शिक्षणाधिकारी प्राथमिक धाराशिव, SCERT संचालक तसेच शालेय शिक्षण मंत्र्यांकडे निवेदन देण्यात आले आहे. "तातडीने चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल," असा इशारा निवेदनकर्त्यांनी दिला आहे.


Post a Comment

0 Comments