बार्शी | प्रतिनिधी
बार्शी तालुक्यातील कव्हे येथील रहिवासी रवेश सुखदेव सिंगण यांनी त्यांच्या पत्नीवर करण्यात आलेली कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी व डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे. या मागणीसाठी १७ जुलै २०२६ रोजी बार्शी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
तक्रारदार रवेश सिंगण यांनी दिलेल्या अर्जानुसार, त्यांच्या पत्नीला आठ महिन्यांचे बाळ झाल्यानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, ही शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्याचा त्यांचा आरोप असून, त्यामुळे त्यांच्या पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या प्रकरणाची तक्रार त्यांनी यापूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात केल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. मात्र, अद्याप संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, १७ जुलै २०२६ पर्यंत या प्रकरणातील जबाबदार अधिकारी व संबंधितांवर विभागीय आणि कायदेशीर कारवाई झाली नाही, तर ते आपल्या कुटुंबासह बार्शी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसतील. उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित आरोग्य विभागाची अधिकृत भूमिका वृत्त लिहीपर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही. त्यांची बाजू प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येते का आणि प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे बार्शी तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
0 Comments